Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठांमध्ये होणार आता अक्षय्य ऊर्जेचा जागर

नवी दिल्ली : देशभरातील विद्यापीठांमध्ये आता अक्षय ऊर्जेचा जागर होणार आहे. त्यासाठी एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि पुण्यातील ग्रीन तेर फाऊंडेशन यांनी आज येथे सामंजस्य करार केला आहे. पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीच्या स्त्रोतांबाबत यापुढील काळात महाविद्यालयीन युवकांमध्ये प्रबोधनाची मोठी चळवळ याद्वारे निर्माण होणार आहे.

पुण्यातील ग्रीन तेर फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पर्यावरण बचावासाठीचे अनमोल कार्य करण्यात येत आहे. पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन फाऊंडेशनसोबत भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटीई)ने सामंजस्य करार केला आहे. त्यामुळेच देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये आता या उपक्रमात सक्रीय झाली आहेत. पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतातील विद्यापीठांमध्ये ही मोहिम सुरू झाली आहे. या उपक्रमाद्वारे उच्च शैक्षणिक संस्थांना कार्बन-न्यूट्रल कॅम्पस तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांसह प्रेरित केले जात आहे.

आता फाऊंडेशनसोबत एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ने आज येथे सामंजस्य करार केला आहे. द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या समारंभाप्रसंगी, संयुक्त राष्ट्राचे माजी सेक्रेटरी जनरल इरिक सोल्हेम, द एनर्जी रिसोर्ट इन्स्टिट्यूट (टेरी)च्या महासंचालक डॉ. विभा धवन, ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि युनेपचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, जीजीजीआयच्या सौम्या गारनाईक, ईईएसएलचे सीईओ विशाल कपूर, महाव्यवस्थापक गिरीजा शंकर आदी उपस्थित होते.

डॉ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक संस्थांमध्ये मोठी मोहिम राबविली जात आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या हवामान परिषदेत (COP28) निर्णय घेण्यात आला की, आपण ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केली पाहिजे आणि अक्षय ऊर्जा तिप्पट केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० परिषदेत तसाच प्रस्ताव ठेवला होता आणि COP28 मधील त्यांच्या भाषणात तो पुन्हा मांडला होता. माजी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री आणि विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत देशातील ५०० विद्यापीठांमध्ये नेट झिरो, ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय्य ऊर्जा जागर ही मोहिम सुरू झाली आहे. त्याद्वारे शेकडो महाविद्यालये सज्ज झाली आहेत. पुणे, चेन्नई आणि नवी दिल्लीतील कार्यशाळेतून या मोहिमेला विशेष बळ मिळाले आहे. विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना एकत्र आणण्याबरोबरच कार्बन न्यूट्रल कॅम्पससाठी या मोहिमेत रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे डॉ. शेंडे यांनी सांगितले आहे.

असा होणार फायदा
विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊर्जा साक्षर बनविले जाणार आहे. शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना कौशल्यवान बनविणे हा हेतू आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे संकट सध्या जगावर घोंघावते आहे. हरित गृह वायूंच्या उत्सर्जनामुळे ही वैश्विक समस्या निर्माण झाली आहे. जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हरित गृह वायू वातावरणात सोडले जातात. यामध्ये ऊर्जा निर्मितीचा वाटा मोठा आहे. त्यामुळे सौर, पवन, जलविद्युत यासह अपारंपरिक स्त्रोतांद्वारे ऊर्जा निर्माण करणे हे पर्यावरणाच्या हिताचे आहे. ऊर्जा कार्यक्षमता सुद्धा बचत होते. याचसंदर्भात या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. विजेची बचत हीच निर्मिती यासह विविध संकल्पनांद्वारे नव्या पिढीला ऊर्जा साक्षर केले जाणार आहे. ऊर्जेचा हा जागर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांपर्यंतही पोहोचणार आहे. येत्या काळात हजारो विद्यार्थी या मोहिमेत हरित सैनिक बनणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading