Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जोडरागाचे सादरीकरण हे कलाकारासाठी आव्हानात्मक – पं राम देशपांडे  

पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे रागदारी संगीत असल्याने इतर संगीतांपेक्षा ते वेगळे आहे. जोडराग ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक आकर्षक अशी घटना मानली गेली आहे. ते सादर करताना घटक रागांवर कलाकाराचे प्रभुत्त्व आवश्यक असतेच यासोबत घटक रागांचे बेमालूम मिश्रण करताना देखील सखोल अभ्यासाची व सूक्ष्म विचारांची जाण महत्त्वाची ठरते. यामुळे कोणत्याही कलाकारासाठी जोडराग सादर करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते, असे प्रतिपादन आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांनी केले.

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सव विमर्श’ या उपक्रमात यावर्षी ‘जोडराग’ या संकल्पनेवर विशेष विमर्श कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी पं देशपांडे बोलत होते. डी पी रस्ता, एरंडवणे येथील पंडित फार्म्स या ठिकाणी या कार्यक्रमाला रसिकांनी चांगलीच हजेरी लावली होती. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांनी जोडरागांची पेशकश करून त्याविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सुरुवातीला त्यांनी राग कापर गौरी प्रस्तुत केला. यामध्ये विलंबित तीन तालातील ख्याल व त्यानंतर ‘सपने मैं दरस दिखा गयो बरस…’ ही रचना गायली.

जोडरागांच्या इतिहासाबद्दल सांगताना ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत शुद्धता महत्त्वाची मानली गेली असल्याने मिश्र, संकीर्ण राग अर्थात रागांचे मिश्रण याला स्थान नव्हते. आपल्या साहित्यात १६ व्या शतकापासून जोडरागांचा उल्लेख आणि रचना आढळतात. त्यातही मागील १५०- २०० वर्षांमध्ये जोडरागांची परंपरा आपल्याला पहायला मिळते. धृपद गायकीत आपल्याला जोड राग दिसत नाहीत, ख्याल गायकीत ते येतात.”

घराण्यांच्या अंगाने अनेक कलाकारांनी वेगळ्या पद्धतीने जोड रागांचा वापर करीत नवी रसनिर्मिती केल्याची उदाहरणे आहेत असे सांगत पं देशपांडे म्हणाले, “जोडराग सादरीकरण ही केवळ बौद्धिक कसरत आहे असा समज चुकीचा आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील प्रतिभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे कलाकाराच्या प्रतिभेवर मिश्र रागांमधूनही रसनिर्मिती अवलंबून असते. जोडरागांमध्येही प्रतिभावान कलाकार भावनिक निर्मिती करू शकतो.”

जोड रागांच्या सादरीकरणावेळी स्वरसंगती आणि स्वरोच्चारण महत्त्वाचे असते. रागात प्रत्येक स्वराचा रोल देखील महत्त्वाचा असतो. त्यामुळे शिष्याने या रागांची माहिती असणाऱ्या उत्तम गुरूंकडून शिकून घेणे ही शिष्याची नैतिक जबाबदारी आहे, असेही पं देशपांडे यांनी नमूद केले.

यानंतर गंधार देशपांडे यांनी खट रागावर आधारित बंदिशी सादर केल्या. पं राम देशपांडे यांना डॉ. चैतन्य कुंटे (संवादिनी), संजय देशपांडे (तबला), गंधार देशपांडे व अर्चना देशपांडे (गायन), श्रीनिवास केंचे आणि ओंकार लोहार (तानपुरा) यांनी साथसंगत केली. डॉ. चैतन्य कुंटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading