गोखले इन्स्टिट्यूटला होणार पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल
१९ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायं. ७.३० दरम्यान आणि २० जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ७.३० दरम्यान बीएमसीसी रस्त्यावरील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या काळे सभागृहात सदर महोत्सव संपन्न होईल. इच्छुक विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, उद्योजक व्यावसायिक यांसाठी तो सशुल्क असून त्यासाठी https://www.pppf.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. साहिल देव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवास परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना महोत्सवाचे आयोजक असलेले डॉ साहिल देव म्हणाले, “सामाजिक समस्यांचे निराकरण करत असताना सर्जनशील विचार हे कायमच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये कृती आणि विचारांचे ‘ट्रेड ऑफ’ हाताळणे हे गरजेचे झाले असून यासाठी विचारवंत, धोरण निर्माते, तज्ज्ञ, विद्यार्थी, उद्योजक, खाजगी क्षेत्रातील तरुण, संशोधक आदींनी पुढे येत विचारमंथन करण्याची गरज आहे. नजीकच्या भविष्याचा विचार करत असताना २०४७ साली भारत कुठे असेल हा विचार होणे महत्त्वाचे ठरेल. यां सर्व बाबी लक्षात लक्षात घेत पुण्यासारख्या शहरात एक महोत्सव व्हावा आणि यामध्ये सांगोपांग चर्चेसोबतच अनेक विषयांवर उहापोह व्हावा हा महोत्सव आयोजित करण्यामागील उद्देश आहे.”
डॉ. साहिल देव पुढे म्हणाले की, “या महोत्सवाद्वारे नव्या पिढीपर्यंत सामाजिक धोरणा संबंधीचे अनेक विषय पोहोचतील आणि त्यांना धोरणात्मक विषयांमध्ये काम करण्यात रुची निर्माण होईल असा आमचा विश्वास आहे. याबरोबरच पब्लिक पॉलिसी विषयावर या महोत्सवा अंतर्गत भरीव चर्चा होऊन केवळ दिल्ली किंवा इतर शहरे त्यासाठीचे एकमेव केंद्र न राहता या विषयावर पुण्यासारख्या वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या समृद्ध शहरात स्थानिक पातळीवर देखील अशा प्रकारची चर्चा होईल, असे आम्हाला वाटते.” विकास आणि पर्यावरण, वाढ (ग्रोथ) आणि समानता, तांत्रिक सुविधा आणि गोपनीयता यांमधील ‘ट्रेड ऑफ’ ही या महोत्सवाची संकल्पना असल्याचेही डॉ देव यांनी स्पष्ट केले.
महोत्सवाला शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. यावेळी भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या आणि केंद्र सरकारच्या सचिव डॉ. शमिका रवी यांचे बीजभाषण होईल. यानंतर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे डॉ रवी यांच्याशी संवाद साधतील. यानंतर ‘शहरी परिवर्तनाची पुनर्कल्पना – पर्यावरण आणि विकास’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीडब्लूसी इंडिया या संस्थेचे भागीदार शार्दुल फडणवीस, डब्लूआरआय इंडिया या संशोधन संस्थेच्या नगरविकास विभागाच्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा सहभाग असेल. भारतातील भू-राजकीय परिस्थितीचे सल्लागार आणि थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुबर्निन इनिशिएटिव्हच्या सह-संस्थापिका आणि संचालिका अंबिका विश्वनाथ या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांशी संवाद साधतील. यानंतर जागतिक बँकेच्या विकास व संशोधन विभागाचे प्रमुख अर्थतज्ज्ञ असलेले विजयेंद्र राव यांच्या व्याख्यानाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
ऑस्ट्रेलिया सरकारचे भारतातील उच्चायुक्त असलेले फिलीप ग्रीन ओएम यांच्या मुख्य भाषणाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल. यानंतर भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले हे त्यांच्याशी संवाद साधतील. यानंतर जर्मनीमधील हर्टी स्कूलमध्ये सार्वजनिक व्यवस्थापन आणि राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ मार्क हॅलरबर्ग, व्हॅल्यू फॉर गुड संस्थेच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका क्लारा पेरॉन यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. फ्लेम विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर डॉ युगांक गोयल त्यांच्याशी संवाद साधतील.
यानंतर ‘रिथिंकिंग- ग्रोथ अँड इक्वॅलिटी’ या विषयावर चर्चासत्र संपन्न होईल. यामध्ये बार्कलेज या बहुराष्ट्रीय युनिव्हर्सल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि देशातील एक प्रमुख अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया, नवम कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मंत्री, ट्रस्टब्रिज संस्थेच्या संशोधन संचालिका असलेल्या रेणुका साने, वेदांत रिसोर्सेसचे अर्थशास्त्र आणि धोरण विभागाचे संचालक आणि अर्थतज्ज्ञ धीरज नय्यर आदी सहभागी होतील. इंडिकस फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमिता काळे यावेळी मान्यवरांशी संवाद साधतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात ‘माध्यमे आणि सामाजिक धोरणे’ या विषयावरील चर्चासत्राने होईल. यामध्ये थिंक बँक लाईव्हचे मुख्य संपादक विनायक पाचलग उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर ‘सार्वजनिक धोरणाचे चेहरे’ या विषयावर चर्चासत्र संपन्न होईल. यामध्ये आयपीएस सुहैल शर्मा, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, गोदरेज समूहाच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागाच्या दक्षिण विभाग प्रमुख मल्लिका श्रीधर सहभागी होतील. दॅट वन पल्स प्रोजेक्टचे संस्थापक सिद्धार्थ रॉय हे यावेळी संवाद साधतील.
यानंतर ‘स्पीडिंग थ्रू : द ट्रेड ऑफ बिटवीन कन्व्हीनिअन्स वर्सेस प्रायव्हसी’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये ब्लॅक डॉट सार्वजनिक धोरण सल्लागार संस्थेचे संस्थापक मंदार कागदे, अर्का या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापिका शिवांगी नाडकर्णी, प्रशासकीय अधिकारी (आयएएस) अंशुल गुप्ता, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फाउंडेशन अर्थात एफओएसएसचे सार्वजनिक धोरण विभागाचे संचालक व्यंकटेश हरिहरन यामध्ये सहभागी होतील. रेझर पे संस्थेच्या सरकारी व्यवहार आणि सार्वजनिक धोरण विभागाच्या संचालिका सरन्या गोपीनाथ यावेळी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधतील.
दुसऱ्या दिवसाचा आणि महोत्सवाचा समारोप केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या भाषणाने होईल. येत्या दशकातील भारतासमोरील सर्वात मोठी आव्हाने आणि त्यावर मात करण्याच्या धोरणांविषयी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर आदित्य जावडेकर हे हरदीप सिंग पुरी यांच्याशी संवाद साधतील.
सदर महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.pppf.in या संकेतस्थळावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
