रसिकांनी अनुभवला मराठी, हिंदी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ
पुणे : ‘खुलविते मेंदी माझा रंग’, ‘दोन घडीचा डाव’, ‘नन्ही कली सोने चली’, ‘कभी तो आ..’, ‘क्यू मुझे इतनी खुषी’ ही सुलोचना, बेबी शकुंतला आणि शशिकला यांच्यावर चित्रीत झालेली आणि अविट गोडीची गाणी आणि प्रसंग रसिकांना आज नव्याने अनुभवायला मिळाले. तर पडद्यामागील या अभिनेत्रींच्या विस्मयकारक कहाण्याही ऐकायला मिळाल्या.
सुलोचना, बेबी शकुंतला, शशिकला आणि आशा भोसले या चार थोर मराठी कन्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर आधारित ‘चंदेरी आठवणी’ हा दृकश्राव्य कार्यक्रम आज (दि. 15) पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता. पूना गेस्ट हाऊस आणि बियाँड एंटरटेन्मेंट पुणे यांची प्रस्तुती होती. सुलोचना, बेबी शकुंतला, शशिकला आणि आशा भोसले यांच्या आठवणींना ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभाताई तेरणीकर यांनी उजाळा दिला. त्यांच्याशी वंदना कुलकर्णी यांनी संवाद साधला.
प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ज्योती ढमाळ तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ अनुभवलेले ज्येष्ठ रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.
‘चल सोडून जा देश पक्षिणी’, ‘लिंब लोण उतरू कशी’, ‘गोड गुपित कळले’, ‘कभी तो आ’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘क्यू मुझे इतनी खुशी’, ‘येणार नाथ आता’, ‘रस बरसे अमृत वीणा’, ‘आईये मेहेरबा’, ‘बुगडी माझी’ अशी काही लोकप्रिय गीते रसिकांना या निमित्ताने ऐकायला मिळाली.
सुलोचनादिदींचा शिस्तबद्धपणा, पुल, गदिमा, रणजीत देसाई यांच्या साहित्याचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, भालजी पेंढारकर यांनी सुलोचना नाव कसे सार्थ ठरले याविषयीच्या काही आठवणी तेरणीकर यांनी या प्रसंगी सांगितल्या. कामानिमित्त कोल्हापूर, मुंबई आणि पुण्याचा घडलेला प्रवास, चारुकाका सरपोतदार यांच्याशी असलेले ऋणानुबंध या संदर्भातील आठवणीही रसिकांना ऐकायला मिळाल्या.
सुसंस्कृत घरात वाढलेल्या शकुंतला यांचे मन मोहवून टाकणारे सौंदर्य, हिंदी चित्रपट सृष्टीतील त्या काळातील आघाडीच्या नायिका मधुबाला, किशोर कुमार यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते मुलाखतीतून उलगडले.
अनेक चित्रपटांमध्ये सहनायिका असूनही रसिकांच्या मनावर ठसा उमटविलेल्या शशिकला यांचा सुख-दु:खाचा जीवनपट रसिकांना गहिरव आणणारा ठरला. जीवनात अनेक चढउतार अनुभवलेल्या शशिकला यांची गाणे शिकायची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
आशा भोसले यांच्या साठीनिमित्त घेलेल्या मुखलाखतीतून काही किस्से रसिकांना ऐकायला मिळाले. त्यांचा स्वभाव म्हणजे आपली बालपणीची मैत्रिण वाटावी असा. साधी राहणी तरी कामाचा झपाटा मोठा. गायन क्षेत्रात आशा भोसले यांना यायचे नव्हते पण त्यांना नियतीने या क्षेत्रात येण्यास भाग पाडले. चौखन्नी गायिका असे आशा भोसले यांच्याविषयी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटल्याचे तेरणीकर यांनी संवादादरम्यान सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन अनघा कोऱ्हाळकर यांनी केले. अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीस श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त प्राची खेडकर आणि भारती धुमाळ यांनी सुरुवातीस रसिकांना अक्षतांचे वाटप केले.
