सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून युवा संगमचा संघ आसामाला रवाना
पुणे – युवा संगम उपक्रमांतर्गत आसामला ‘सांस्कृतिक-शैक्षणिक प्रवास भेट’ देण्यासाठी राज्यातील ५० विद्यार्थ्यांचा संघ आज सावित्रीबाई फुले पणे विद्यापीठातून रवाना झाला आहे. या संघास शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून एआयसीटीइचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, संदिप पालवे, डॉ. नितिन घोरपडे, ज्योत्स्ना एकबोटे, रासेयोचे संचालक प्रा.(डॉ). सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अभियानांर्गत युवा संगममार्फत एका राज्यातील विद्यार्थी दुसऱ्या राज्याला भेट देऊन सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण करत असतात. या उपक्रमाचा सध्या तिसऱ्या टप्पा सुरू असून यासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेणाऱ्या ५० विद्यार्थ्यांची या भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हे आसाम या राज्यासोबत भागीदार राज्य म्हणून सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम राबविणार आहे. हा अभ्यास दौरा १३ ते २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी संघास हिरवा झेंडा दाखवल्यानंतर संघाने प्रस्थान केले.
