सूर रागांनी रंगले निर्धार संगीत नाटक
पुणे : रंगमंचावरील मंद प्रकाश योजना, पार्श्वभागावर मोठ्या पडद्यावर छायाचित्रांच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणारी देशातील विविध ठिकाणे…सखोल अभ्यास करुन मांडण्यात आलेल्या घटना. आणि ज्येष्ठ गायक पं. विकास कशाळकर यांच्या दर्जेदार अभिनयातून आणि रागांच्या माध्यमातून उलगडत जाणारे ज्येष्ठ गायक विष्णूबुवा पलूस्कर यांचे जीवन अशा भारलेल्या संगीतमय वातावरणात सूर आणि रागांनी नटलेले निर्धार संगीत नाटक रंगले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची जयंती आणि विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विकास कशाळकर यांच्या निर्धार या संगीत नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या माध्यमातून काशाळकर यांनी ज्येष्ठ गायक विष्णुबुवा पलूस्कर यांचे जीवन विविध राग आणि संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडले.
प्रेक्षकांनीही संगीताचा मनमुराद आनंद घेत टाळ्यांच्या स्वरूपात पंडित विकास कशाळकर यांना दाद दिली. भारती विद्यापीठाचे कुलसचिव जे. जयकुमार, ज्येष्ठ गुरू सुचेता चापेकर, अंजली मालकर, पंडित रघुनाथ खंडाळकर. पंडित रघुनंदन पळशीकर, पं. अंगद गायकवाड, पं. पांडुरंग मुखडे, मंजुषा पाटील, शुभांगी बहुलिकर, मंगेश वाघमारे, गोविंद बेडेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
सांगलीतील कुरुंदवाड येथे घालवलेले बालपण नरसोबाची वाडी आणि कृष्णामाईच्या परिसरात बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे घेतलेले संगीताचे शिक्षण. त्यानंतर मिरजेमध्ये श्रीमंतांच्या दरबारी केलेली संगीत सेवा, तेथे आपले गुरु यांची होणारी संगीत विषयक घुसमट पाहून त्यानंतर औंधच्या पंतप्रतिनिधींकडे संगीत सेवेसाठी केलेला प्रवास, त्यानंतर बडोदा जुनागड गिरनार पर्वत ते लाहोर आणि राजस्थान मधील भरतपूर पर्यंत केलेला संगीत सेवेसाठी प्रवास, अशा विविध टप्प्यांच्या माध्यमातून डॉ. विकास कशाळकर यांनी आपल्या गायन आणि अभिनयाच्या माध्यमातून विष्णुबुवा पलुस्कर यांचे जीवन रसिकांसमोर मांडले.
शारंगधर साठे म्हणाले, शास्त्रीय संगीत विविध माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे आणि शास्त्रीय संगीताचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी पंडित पलुस्कर यांचे योगदान खूप मोठे आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना स्फूर्ती मिळण्यासाठी विविध उपक्रम भारती विद्यापीठ राबवत आहे. यामुळे तानसेन जरी तयार झाले नाहीत तरी शास्त्रीय संगीत ऐकण्याची गोडी प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल आणि त्यातूनच शास्त्रीय संगीताचे प्रेक्षक निर्माण होतील, अशी आम्हाला आशा आहे.
