Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

सुप्रिम कोर्ट संघाची विजयांची हॅट्ट्रीक; अलाहाबाद, पंजाब-हरयाणा संघांचे सलग दोन विजय !!

पुणे : नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सुप्रिम कोर्ट संघाने सलग तीन विजयांसह बाद फेरीकडे वाटचाल केली. अलाहाबाद हायकोर्ट संघ आणि पंजाब-हरयाणा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली.

डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या सामन्यात राजबीर पनवर याच्या नाबाद १४९ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सुप्रिम कोर्ट संघाने चैन्नई संघाचा २१० धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सुप्रिम कोर्ट संघाने २४६ अशी विशाल धावसंख्या उभी केली. राजबीर पनवर याने ६१ चेंडूवर १५ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १४९ धावांची खेळी केली. राजबीर याने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत चैन्नई संघाच्या गोलंदाजांना चोपून काढले. शक्ती भाटी याने ५२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी ८२ चेंडूत १५५ धावांची सलामी दिली. त्यानंतर राजबीरने कर्णधार शौमेंदू मुखर्जी (३२ धावा) याच्या साथीमध्ये तिसर्‍या गड्यासाठी ३० चेंडूत ७१ धावा चोपून २४६ धावांचा डोंगर उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना चैन्नई संघाने पहिल्याच चेंडूवर आपला सलामीवीर अमर पी. गमावला. दुसर्‍या षटकामध्ये सुप्रिम कोर्टचा गोलंदाज अमित शर्मा याच्या गोलंदाजीवर अलेक्स् सी. पायचीत झाला. पंच चंदन राजपुत यांनी दिलेला हा निर्णय फलंदाज आणि इतर संघ सहकारी यांनी अमान्य केला आणि सामना सुरू ठेवण्यास अटकाव केला. चैन्नई संघाच्या खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे पंच असिफ शेख आणि पंच चंदन राजपुत यांनी सुप्रिम कोर्ट संघाला विजयी घोषित करून विजयीगुण बहाल केले. (वकील आणि न्यायाधीश यांच्या सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यातील पंचांनी नियमांना धरून न्यायनिवाडा करून सामन्याचा निकाल घोषित केला.)

अजय पांडे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अलाहाबाद संघाने आंध्रप्रदेश संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. अजय पांडे याने १० धावांमध्ये ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. राणा सिंग याच्या अष्टपैलू खेळीमुळे पंजाब-हरयाणा संघाने चैन्नई संघाचा २ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सुप्रिम कोर्टः २० षटकात ३ गडी बाद २४६ धावा (राजबीर पनवर नाबाद १४९ (६१, १५ चौकार, ११ षटकार), शक्ती भाटी ५२ (४१, ६ चौकार, १ षटकार), शौमेंदू मुखर्जी ३२, विवेक के. २-३२);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी राजबीर आणि शक्ती यांच्यात १५५ (८२); दुसर्‍या गड्यासाठी राजबीर आणि शौमेंदू ७१ (३०) वि.वि. चैन्नई संघः २ षटकात २ गडी बाद ३६ धावा (अलेक्स् सी. १८, प्रेम पी. नाबाद १८, अमित शर्मा १-१८); सामनावीरः राजबीर पनवर;

आंध्रप्रदेश संघः १७.५ षटकात १० गडी बाद ६७ धावा (निखील जे. १५, जी. नीलोथपाल १२, अजय पांडे ४-१०, निलेश पी. ३-४, हेमंत चहर ३-१४) पराभूत वि. अलाहाबाद संघः ६.१ षटकात ३ गडी बाद ६८ धावा (निलेश पी. २५, आझाद दिवाण २३, श्रीनिवासराव एम. १-१०); सामनावीरः अजय पांडे;

चैन्नई संघः २० षटकात १० गडी बाद १५३ धावा (बाला प्रसाद ६० (४९, १० चौकार), अलेक्स सी. २३, राणा सिंग २-३२, नरवाल सिंग २-२४) पराभूत वि. पंजाब-हरयाणा संघः १९.३ षटकात ८ गडी बाद १५४ धावा (नितीन राठी ३७, दिवाकर चौहान २६, राणा सिंग २६, सेल्वा सी. २-३४); सामनावीरः राणा सिंग;

आंध्रप्रदेश संघः २० षटकात ९ गडी बाद १०२ धावा (निखील पी. ३८, निशीम चंद्रा ३-१८, आदित्य चौधरी २-१३, अजित राणा २-१५) पराभूत वि. सुप्रिम कोर्ट संघः १२ षटकात ३ गडी बाद १०३ धावा (शक्ती भाटी ५२ (३१, ६ चौकार, २ षटकार), भावतोश शर्मा नाबाद ३०, श्रीनिवासराव एम. १-१८); सामनावीरः निशिम चंद्रा;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading