Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकसभा निवडणुकीत ४५ जागांवर महायुतीचा विजय निश्चित – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे सुपर वॉरियर्स प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील जनमत मोदींच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४५ जागांवर महायुती निश्चित विजय मिळवेल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच ‘विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मुठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना ४४० व्होल्टचा करंट लावणार आहे’, असेही सांगितले. 

‘महाविजय-२०२४’ अभियानांतर्गत मंगळवारी ते माढा लोकसभा क्षेत्रात प्रवासावर होते, त्यावेळी ते फलटण येथे संपर्क से समर्थन अभियानात जनतेशी संवाद साधत होते. यावेळी बावळकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तडे दिले, अन् यामुळे तर पंतप्रधान मोदी हेच सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात हा विश्वास असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत आले आहेत, महाविकास आघाडी काळात महाराष्ट्र थांबला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार अडीच वर्षे फेसबुक लाईव्हवर होते. थांबलेला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गतिमान करण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आले, तर अजित पवारांनी मोदीजींच्या सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे. 

त्यांच्या या प्रवासात खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आ.राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, डॉ. दिलीप येळगावकर, सोमनाथ भोसले, सचिन कांबळे, नवनाथ पडळकर, अनुप मोरे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग गावडे, अमोल सास्ते, जयकुमार शिंदे, सचिन अहिवळे आदी उपस्थित होते. 

मुस्लिमांकडून श्रीरामाची प्रतिमा भेट

फलटण येथे ‘संपर्क से समर्थन’ अभियात सुमारे १५० मुस्लिम बांधवांनी बावनकुळे यांची भेट घेवून त्यांना प्रभू श्री रामाची प्रतिमा भेट दिली. ५२७ वर्षे आणि २५ पिढ्यांपासून प्रभू रामाची पूजा एका तंबूत केली जाते. पंतप्रधान मोदीजी यांनी अयोध्येत जगातील सर्वांत सुंदर श्रीरामाचे मंदिर बांधले असून त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी २२ जानेवारीला जगातली सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading