बाबासाहेबांचे अर्थव्यवस्थेविषयी विचार आजही कालसुसंगत – डॉ. अजित रानडे
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साधारण शंभर वर्षापूर्वी आपल्या अर्थविषयीच्या प्रबंधातून रुपयाबाबत मांडलेले विचार आणि संशोधन आजही कालसुसंगत आहे. याहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थ्यव्यवस्थेबाबतचे विचार, अभ्यास आणि ज्ञानाची आपल्याला माहिती होते, असे मत गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात द प्रॉब्लेम ऑफ रूपी यावर परिसंवाद झाला. या परिसंवादात कुलगुरू डॉ. रानडे बोलत होते. यावेळी ‘डीक्की ‘चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संयोजन समितीचे सदस्य ॲड मंदार जोशी आदी उपस्थित होते. पुणे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
डॉ. रानडे म्हणाले की, डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून दोन अर्थव्यवस्थेविषयी प्रबंध सादर केले होते. त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रूपी या प्रबंधातून रुपयाच्या वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या मूल्याचा उद्योजक आणि सामान्यांवर होणार परिणाम सांगितला होता. त्यांनी त्यावेळी रुपयाच्या एक्सचेंज मूल्याबाबत मत स्पष्ट केले होते. हे आजही आपल्या रुपयाशी सबंधित आहे. या प्रबंधात त्यांनी सोन्याच्या दरांबाबतही भाष्य केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मॉनिटरी पॉलिसी जाहीर केल्या जाते. या पॉलिसीबाबतचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबंधात लपले आहे. त्यामुळे हा प्रबंध रुपयाच्या मूल्याचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतो, असे डॉ. रानडे यांनी सांगितले.
कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तम असे कॉर्पोरेट लॉयर होते. त्यांचे कायदा विषयासोबतच अर्थविषयक ज्ञान हे उच्च होते. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी फार यशस्वीपणे काम केले आहे. बाबासाहेब हे प्रागतिक विचाराचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचे योगदान हे अमूल्य आहे. त्यांच्या या सर्व विचारांना पुढे नेण्याचे काम आम्ही डीक्की संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत, असे कांबळे यांनी सांगितले. ॲड मंदार जोशी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुनील भंडगे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सगळी व्यस्तता होती. मात्र, तरीही त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी नियतकालिके काढून, त्यात लिखाण केले. त्यांच्याकडे ३५ हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा जपणारा जगात दुसरा कोणीही व्यक्तिमत्त्व नाही. या ग्रंथालयात विविध देशांच्या राज्यघटना होत्या. बाबासाहेबांच्या या सर्व वाचन संस्कृतीचे आपण पाईक होण्याचा विचार केला पाहिजे असे मराठे यांनी सांगितले.
