सांगली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध –वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
नागपूर : सांगली जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भातील प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, सांगली सामान्य रुग्णालयांमध्ये फक्त ४०० खाटांची सुविधा असून सांगली जिल्हा, उत्तर कर्नाटक, कोकण, सांगोला जि.सोलापूर, जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी जि.कोल्हापूर इत्यादी परिसरातील रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात.त्यामुळे या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सीटी स्कॅन मशीन खरेदी करिता अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.सामान्य रुग्णालय, सांगली हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,मिरज या संस्थेशी संलग्नित असल्याने तेथे सर्व तपासण्या करण्यात येत असल्याचेहीमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
