डार्क अकादमी, वॉरीयर्स संघांचे शानदार विजय
पुणे : डार्क क्रिकेट अकादमी व वॉरीयर्स संघाने अनुक्रमे वॉव क्रिकेट अकादमी व आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या आजच्या लढतीमध्ये डार्क क्रिकेट अकादमी संघाने वॉव क्रिकेट अकादमी संघाला तब्बल १० गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना वॉव संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद ८७ धावांपर्यंत मजल मारली. अमानी नंदलने ६६ चेंडूत ५२ धावांची खेळी ३ चौकारांनी सजविली. तिला अक्षया जाधवने १० धावा करताना सुरेख साथ दिली. डार्क संघाकडून पूनम मुळे, रिशिता सायकर व वेदिका दळवी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
डार्क संघाने १३.२ षटकांत बिनबाद ८८ धावा करताना विजय साकारला. डार्क संघाकडून नीतीने ५२ चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने ५६ धावांची खेळी केली. तिला पल्लव बोडकेने २८ चेंडूत १६ धावा करताना सुरेख साथ दिली.
दुसऱ्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला वॉरीयर्स संघाने ७ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने १९.१ षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. यामध्ये संजीवनी पवार ३८ (५ चौकार), संजना शिंदे २३ (४ चौकार) तर नियती जाधवने १५ (३ चौकार) धावांची खेळी केली. वॉरीयर्स संघाकडून सई चव्हाण, अदिती वाघमारे व उत्कर्षा कदम यांनी प्रत्येकी २ तर अनन्या चव्हाण व ज्ञानेश्वरी पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
वॉरीयर्स संघाने १५.४ षटकांत ३ बाद ११८ धावा करताना विजय साकारला. वॉरीयर्स संघाकडून चार्मी गवईने ४३ चेंडूत ८ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. तिला कर्णधार उत्कर्षा कदमने नाबाद २६ (२२ चेंडू, ४ चौकार) तर अदिती वाघमारेने १५ (१६ चेंडू, २ चौकार) तर परिणीता पाटीलने १३ (८ चेंडू, २ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाकडून किरण नवगिरे व संजीवनी पवार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
वॉव क्रिकेट अकादमी : २० षटकांत ३ बाद ८७ : अमानी नंदल ५२ (६६ चेंडू, ३ चौकार), अक्षया जाधव १० (१३ चेंडू, १ चौकार), सिद्धी राणे ६ (२१ चेंडू), पूनम मुळे ३-०-१७-१, रिशिता सायकर ४-०-१०-१, वेदिका दळवी २-०-१३-१ पराभूत विरुद्ध डार्क अकादमी : १३.२ षटकांत बिनबाद ८८ : नीती ५६ (५२ चेंडू, ८ चौकार), पल्लव बोडके १६ (२८ चेंडू)
आझम स्पोर्ट्स अकादमी : १९.१ षटकांत सर्वबाद ११७ : संजीवनी पवार ३८ (३९ चेंडू, ५ चौकार), संजना शिंदे २३ (२३ चेंडू, ४ चौकार), नियती जाधव १५ (११ चेंडू, ३ चौकार) अदिती वाघमारे ३.१-०-२०-२, उत्कर्षा कदम ४-०-२७-२, सई चव्हाण ४-०-३३-२, ज्ञानेश्वरी पाटील ४-०-१४-१, अनन्या चव्हाण ४-०-१९-१ पराभूत विरुद्ध वॉरीयर्स : १५-४ षटकांत ३ बाद ११८ चार्मी गवई ५१ (४३ चेंडू, ८ चौकार), उत्कर्षा कदम नाबाद २६ (२२ चेंडू, ४ चौकार), अदिती वाघमारे १५ (१६ चेंडू, २ चौकार), परिणीता पाटील १३ (८ चेंडू, २ चौकार) संजीवनी पवार ४-१-२५-१, किरण नवगिरे ४-०-२८-१.
