क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त सजले कसब्यातील अतिप्राचीन मंदिर
पुणे : कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. या भागातील पुण्याचे अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाला स्थापित देवतांचे आवाहन व पूजनाने प्रारंभ झाला. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे उत्सवात दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सवात श्री दत्तयाग महायज्ञ देखील होणार आहे. श्रीदत्त मालापाठ व आरती यांसह पूजा-अर्चा असे धार्मिक कार्यक्रम देखील दररोज होणार आहेत. मंगळवारी (दि.५) सकाळी ७.३० वाजता लघुरुद्र, महापूजा व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी शत नामावली, आरती आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होईल.
उत्सवानिमित्त विद्युतरोषणाई, फुलांची आरास व पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर सजविण्यात आले आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव सुरु आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.
