रमेश महाले यांसारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांमुळेच देशाची मान उंचावली – अॅड. उज्वल निकम
पुणे : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करते वेळी पोलिसांवर मोठे दडपण होते. याच काळात राजकीय स्थित्यंतरे देखील होत होती. या दरम्यान अनेक गंभीर प्रसंग आले मात्र, रमेश महालेंसारखे सच्चे, सौजन्यशील, हुशार आणि प्रामाणिक अधिकारी असल्याने कसाबच्या माध्यमातून पाकिस्तानचा चेहरा संपूर्ण जगासमोर उघडा पडला. महालेंसारखे अधिकारी असल्यानेच जगभरात मुंबई पोलिसांची आणि देशाची मान उंचावली असे प्रतिपादन ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले.
आज पुण्यात मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांना महाराष्ट्रातील पहिला एन्काऊंटर करणारे पोलीस उपअधीक्षक कै. वसंतराव ढुमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘कृतज्ञता सन्मान’ अॅड उज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे हे पाहिले वर्ष असून रोख रुपये २१ हजार आणि मानपत्र असे त्याचे स्वरूप होते.
मयूर कॉलनी येथील एम.ई.एस. बालशिक्षण सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कै. वसंतराव ढुमणे यांचे चिरंजीव अजय ढुमणे, निलेश सोनिगरा फाउंडेशनचे निलेश सोनिगरा, सोहनलाल सोनिगरा आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर सुप्रसिद्ध मुलाखतकार, निवेदक राजेश दामले यांनी रमेश महाले यांची प्रकट मुलाखत घेतली.
या आधी बोलतान उज्ज्वल निकम म्हणाले, “तपास सुरु असताना मला अनेक वेळा माहितीच्या नोंदी लागायच्या तेव्हा मी पहाटे ५ असो की ६ कधीही महालेंना फोन करायचो आणि ते प्रत्येक वेळी आवश्यक माहिती मला उपलब्ध करून द्यायचे. महाले यांसारख्या अधिकार्यांकडून आज प्रत्येक नवोदित पोलीस अधिकारी प्रेरणा घेईल. चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायलाच हवे. अशाच कर्तबगार अधिकाऱ्यांही देशाला गरज आहे.”
अनेकजण आम्हाला विचारतात की कसाबला फाशी झाली म्हणजे न्याय झाला का? मात्र कसाब हे एक माध्यम होते हेच विसरल्या जाते. कसाबला न्याय्य प्रकियेने शिक्षा झाल्याने यामुळे खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला, असेही निकम म्हणाले.
सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड झाली तेव्हाच आम्ही अर्धी लढाई जिंकली असे वाटले होते असे सांगत रमेश महाले म्हणाले, “अनेकदा पोलिस तपास करतात मात्र न्यायालयात त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होत नाही. या तपासात उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीपासून योग्य अशी काळजी घेतली आणि म्हणूनच कसाबवरील गुन्हा सिद्ध होऊ शकला. कसाब अनेकदा मी १६ वर्षांखाली आहे, असे दावे करीत होता मात्र उज्ज्वल निकम यांनी योग्य पद्धतीने कसाबच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आणि तपास यंत्रणा व सरकारी वकील यांमध्ये योग्य समन्वय घडून आला.”
अनेकदा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपला सत्कार व्हावा अशी पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा असते, आज माझ्या हस्ते महालेंचा होत असलेला सत्कार हा एक अलौकिक योग आहे असे मला वाटते, असेही निकम आवर्जून म्हणाले.
कसाब हा अत्यंत हुशार आणि चलाख होता कोर्टात सुरु असलेल्या सर्व गोष्टी तो निरखायचा असे सांगत महाले पुढे म्हणाले की, “या तपासात एकून २१०० साक्षीदारांचे जबाब नोंदवल्या गेले यापैकी ६५७ जणांची उलटतपासणी झाली. साक्षीदारांना भीती वाटायची की आपण साक्ष दिल्यास दाऊदची लोकं आपल्याला मारतील परंतु त्यांना आम्ही विश्वासात घेतले, न्यायालयात उभे राहिल्या नंतर आमचा एकही साक्षीदार फुटला नाही हे विशेष. पाकिस्तान पुरस्कृत हल्ले आपल्याकडे २००८ च्या आधीही होत होते नंतरही झाले मात्र पाकिस्तानचा यामध्ये असलेला सहभाग सिद्ध झाला नाही. या तपासात आम्हाला ते यश मिळाले.”
या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात जाताना दिल्लीत गेलो असता महाराष्ट्र सदनात रहायला खोली मिळाली नाही, दोन तीन वेळा असेच झाले मात्र शेवटी राज्य सरकारकडून अध्यादेश काढला आणि अखेर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर महाराष्ट्र सदनात खोल्या उपलब्ध होऊ लागल्या अशी कटू आठवण देखील महाले यांनी सांगितली.
दहशतवाद्यांविरुद्ध लढताना हत्यारांपेक्षा आमचे धैर्य महत्त्वाचे ठरले. दहशतवाद्यांकडे एके ४७ असताना आमच्या पोलिसांनी रिव्होल्व्हरने, लाठीकाठीने त्यांना विरोध केला, असे महाले म्हणाले. तुकाराम ओंबाळे कसे शहीद झाले तो प्रसंग सांगताना सभागृहात सर्वांच्याच अंगावर काटा आला.
निलेश सोनिगरा फाउंडेशन यांचा कार्यक्रमात सृजन सहभाग होता. नीलेश सोनिगरा, अजय ढुमणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. राजेश दामले यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय ढुमणे यांनी केले तर राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
