Wednesday, September 2, 2026
Latest NewsLIFESTYLE

‘वंडरफोल्ड २०२३’ या ओरिगामी कला प्रदर्शनाला सुरुवात

पुणे  : इंदुताई टिळक कला केंद्र व ओरिगामी मित्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वंडरफोल्ड २०२३’ या ओरिगामी कला प्रदर्शनाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे व शिल्पकार सतीश घाटपांडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. लोकमान्य टिळकांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ दीपक टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरू डॉ गीताली टिळक, रजनी देवल, यशोदा वाकणकर, ओरिगामी मित्रचे सुधाकर जोशी, मिलिंद केळकर यांबरोबर इतर अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

येत्या रविवार दि २६ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या काळात हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार असून प्रदर्शन पाहण्यासाठी देणगी प्रवेशिका प्रतिव्यक्ती रुपये २० फक्त इतक्या आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

सदर प्रदर्शनाची ही १७ वी आवृत्ती असून हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरविण्यात येत असते. परंतु कोरोनामुळे चार वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन होत असून याहीवर्षी विद्यार्थी, पालक आणि रसिकांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय असल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे सदस्य व ओरिगामी कलाकार मिलिंद केळकर यांनी दिली.

जपानी पारंपारिक कलेचा एक भाग म्हणून जगाला आज ओरिगामीची ओळख आहे. या कलेसाठी करण्यात येत असलेले फोल्ड्स हे किती प्रभावी आहेत याची झलक मला आज या प्रदर्शनानिमित्त मिळाली. जपानी संस्कृतीतील अशा अनेक मूल्यांकडे आज वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज असल्याचे नरेंद्र डेंगळे म्हणाले. एका साध्या पेपरच्या तुकड्याचे या कलेद्वारे होत असलेले रुपांतर विशेष असून ओरिगामी करताना प्रत्येकाने आपल्या कल्पनाशक्तीचा विस्तार करायला हवा, असे सतीश घाटपांडे यांनी नमूद केले. डॉ दीपक टिळक यांनी आपल्या आईंच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला. यावेळी मानस जोशी आणि आर्यन काशीकर या दोन तरुण ओरिगामी कलाकारांचे विशेष कौतुक उपस्थित पाहुण्यांच्या वतीने करण्यात आले. मानस हा युनिट ओरिगामी प्रकार करतो तर आर्यनच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

कागदाच्या वैशिट्यपूर्ण घड्या घालून विविध प्रतिकृती साकारणारी ओरिगामी ही एक जपानी कला असून या प्रदर्शनात पुये आणि मुंबई येथील सुमारे ३५ ते ४० कलाकारांच्या ५०० हून कलाकृती बघण्यास उपलब्ध आहेत. यातील काही फोल्ड्स स्वीडन हून देखील आलेले आहेत. प्रदर्शनातील कालाकृतींमध्ये सुंदर लँप शेड, प्राणी, फुले, मानवी आकार, इमारती, विविध वस्तू, सांगीतिक वाद्ये, भौमितिक कलाकृती व आकर्षक डिझाईनच्या छोट्या कागदी प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत हे विशेष. प्रज्ञा काशीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading