विद्यार्थांच्या उद्योजकताभिमुख शिक्षणासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे अभिनव पाऊल
पुणे : उपलब्ध संधींचा फायदा करून घेत आपले विद्यार्थी स्टार्ट अप्सच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळत असताना त्यांना भविष्याच्या दृष्टीने अभियांत्रिकीच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच अर्थशास्त्राचे शास्त्रोक्त ज्ञानही मिळावे, या उद्देशाने पुण्यातील सुप्रसिद्ध सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. या अंतर्गत आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी अर्थशास्त्राचे औपचारिक धडे गिरवणार आहेत. विशेष म्हणजे अर्थशास्त्रातील शिक्षणासाठी देशात नावाजलेल्या पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे शिक्षक यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज आलेल्या पत्रकार परिषदेत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ उद्योजक डॉ प्रमोद चौधरी यांनी केली.
शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेसाठी यावेळी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुधीर आगाशे, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, डॉ रविंद्र उटगीकर, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे आर पी गुप्ता, मोहित कुमार श्रीवास्तव, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रो. एम आर नांदगांवकर, एम जे राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या संदर्भातील सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या.
याबद्दल अधिक माहिती देताना डॉ चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम बनविण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने हे आश्वासक पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच अर्थशास्त्रासारखे आवश्यक शिक्षण घेता येणे शक्य होईल. एक जबाबदार नागरिक आणि व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असताना सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन आम्ही अशा प्रकारे प्रयत्न करीत आहोत.” देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याकडेही डॉ चौधरी यांनी लक्ष वेधले.
या कराराबद्दल अधिक माहिती देताना प्रो आगाशे म्हणाले, “नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशभरात सुरु असताना केवळ एकाच पद्धतीने विचार करीत संस्थांचे विद्यापीठात रुपांतर करण्याचा ओढा सर्वत्र दिसत आहे. मात्र बहुउद्देशीय उद्दिष्टांसोबतच समान ध्येय समोर ठेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे हे आमच्या लक्षात आले. म्हणूनच समविचारी संस्थांनी एकत्र येत एकमेकांना मदत करावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले. या आमच्या प्रयत्नांत आता गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था देखील सहभागी झाली असून आज आम्ही हा सामंजस्य करार करीत आहोत.”
या कराराद्वारे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे शिक्षक सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे शिक्षण देतील तर आमचे शिक्षक गोखले संस्थेच्या विद्यार्थांना तंत्रज्ञान विषयक विषय शिकवू. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सहामाहीत ३ क्रेडिट्स अशा पद्धतीने ६ सेमिस्टर आम्ही हे विषय शिकविणार आहोत. या बरोबरच दोन्ही संस्था आपापले ज्ञान, तज्ज्ञ आणि साधने यांचा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करतील, अशी माहितीही प्रो. आगाशे यांनी दिली.
एनईपी अंतर्गत आंतरविद्याशाखीय शिक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून देशातील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आणि देशातील सर्वात जुनी अर्थशास्त्र शिकवणारी व संशोधन करणारी आमची संस्था आता यानिमित्ताने एकत्र आलो आहोत, असे सांगत डॉ अजित रानडे म्हणाले, “आज मोठ्या प्रमाणात अभियंते स्टार्ट अप्स आणि उद्योजकतेकडे वळत असताना त्यांना अर्थशास्त्राचे शिक्षण देणे हे क्रमप्राप्त असून आजवर याचा विचार झाला नाही, मात्र आता आपल्या पंतप्रधानांच्या दृष्टीतील ‘मेक इन इंडिया’ साकारायचे असेल तर तांत्रिक शिक्षणासोबतच वित्त, अर्थशास्त्र, सर्व्हे कसे करायचे, ग्राहकांचे फीडबॅक यांसंबंधीचे शिक्षणही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. हीच बाब अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही लागू होते त्यांना देखील तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, एआयएमएल, डेटा सायन्स आर्टिफिशीअल इन्टेलिजन्स याची माहिती या प्रकल्पाद्वारे मिळू शकते. अंतिमत: या सर्वांमधून एक इकोसिस्टीम तयार होण्यास नक्कीच मदत होईल.”
अभियांत्रिकीच्या विद्यार्थांना अर्थशास्त्र हा विषय ऐच्छिक असून शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून यासाठी कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा हे संस्थेच्या वतीने ठरविण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या कलाप्रमाणे हे निर्णय घेण्यात येणार असून यासाठीचा पायलट प्रकल्प येत्या जानेवारी २०२४ च्या सहामाहीत सुरु होईल. त्यानंतर २०२४-२५ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात होऊन दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून तो राबविला जाईल. प्रकल्पाचे मूल्यांकन हे गोखले संस्थेच्याच वतीने होईल. हे विषय ऐच्छिक आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकविण्यात येतील. नजीकच्या भविष्याचा विचार करता दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थी करीत असलेली इंटर्नशिपची देखील आम्ही पुनरर्चना करीत आहोत अशी माहिती प्रो आगाशे यांनी दिली.
