fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

आत्मनिर्भर भारतासाठी प्लॅस्टिक उद्योगांचे योगदान मोलाचे – डॉ. रमण गंगाखेडकर

पुणे : कोणताही देश स्वयंपूर्ण होण्यासाठी येथील उद्योजकांचे योगदान गरजेचे असते. भारतातील प्लॅस्टिक उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांच्या कामगिरीमुळेच कोव्हिड काळातही भारत कोव्हिडच्या संकटातून बाहेर पडू शकला असे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने पुण्यातील उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, एफसीई इंडिया बिझनेस डायरेक्टर डॉ. संदीप वायकोले, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, महाराष्ट्र राज्य दुध व्यापारी संघटनेचे सचिव प्रकाश कुटवाल, चितळे ग्रुपचे विश्वास चितळे, प्लास्टीव्हिजन इंडियाचे प्रमोशन हेड रवी जश्नानी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, मास्क, पीपीई किट, सिरीन, सलाईंची बॉटल यांची उत्पादने कोव्हिड काळात मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यामुळे रुग्णांची आणि वैदयकीय सेवा देणाऱ्या संस्थांची गैरसोय झाली नाही.  कोव्हिड काळात प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांनी अविरतपणे काम केल्यामुळे कोव्हिड नियंत्रण करण्यात मदत झाली. त्यामुळेच प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे कोव्हिड काळात महत्वपूर्ण योगदान दिले. पुण्यातील उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अतुल शिरोडकर म्हणाले, की ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे हे १२ वे प्रदर्शन आहे. तब्बल ३० हून अधिक देशांतील उत्पादकांचे स्टॉल्स राहणार आहेत. उद्योग क्षेत्रातील विविध विभागांतील १५०० हून अधिक उत्पादक आपले स्टॉल्स लावणार आहेत. जगातील अव्वल तिसऱ्या क्रमांकाचे हे प्रदर्शन असणार आहे.

विश्वास चितळे म्हणाले की विविध क्षेत्रात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सर्वात महत्त्वाचे की हे सर्व रिसायकल होत आहे. त्याचा आनंद आहे. प्रदर्शनामुळे उद्योग वाढीला, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास निर्यातीस तसेच रोजगाराला चालना मिळेल.

प्लॅस्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होईल, हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दि. ७ ते ११ डिसेंबरदरम्यान गोरेगावातील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदर्शनाचे महाराष्ट्राचे प्रमोशन अधिकारी रवि जशनाणी यांनी दिली.

यावेळी रवि जशनाणी समवेत सिद्धार्थ शहा, विनोद ओझा, चेतन जोशी, शंकर रामन अय्यर, शिवा अय्यर.

Leave a Reply

%d