पुष्पवृष्टी आणि भारतमातेच्या जयघोषात सैनिकांच्या वीरमातांची भाऊबीज
पुणे : जय हिंद आणि भारत माता की जय… ही दोन घोषवाक्ये ओठावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुणेकरांनी अनोखी मानवंदना दिली. फुले व रांगोळीच्या पायघडया, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि आजीपासून नातीपर्यंत प्रत्येक लहानथोरांनी पुष्पवृष्टी करुन सैनिकाच्या कुटुंबाचे केलेले स्वागत अशा देशप्रेमाने भारलेल्या वातावरणात कसबा गणपती मंदिरात वीरमातांची भाऊबीज साजरी झाली. सनई-चौघडयांच्या निनादात झालेले स्वागत आणि पुणेकरांचे प्रेम पाहून त्या वीरमातांना देखील अश्रू अनावर झाले.
निमित्त होते, सैनिक मित्र परिवारतर्फे भाऊबीजेनिमित्त कसबा गणपती मंदिरात वीरमातांसोबत भाऊबीज या अनोख्या कार्यक्रमाचे. यावेळी वीरमाता कुसुम ताथवडे, गीता गोडबोले, मंगल ओझरकर, लता नायर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला गिरीप्रेमी चे संस्थापक आनंद पाळंदे, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष शाम मानकर, छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्रीरंग इनामदार, पुणे मर्चंट चेंबरचे काका रायसोनी, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.
सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ म्हणाले, सैनिकांमुळेच आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच त्यांची आठवण देखील आपण ठेवायला हवी. सैनिक व त्यांचे कुटुंबिय हा आपला अभिमान आहे. सैनिक व देवाची आठवण फक्त युद्ध वा संकटकाळात होणे चुकीचे आहे. त्यामुळे वर्षभर सैनिक कुटुंबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याकरीता सैनिक मित्र परिवार प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
संगिता ठकार, गिरीश पोटफोडे, अनिल दिवाणजी, शकुंतला खटावकर, कल्याणी सराफ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.