fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

राज्यातील केळीची युरोप येथे प्रायोगिक निर्यात

 

पुणे  : कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)चे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यात वासुंदे येथील आयएनआय प्रा.लि. येथून युरोपला केळीची ट्रायल शिपमेंट पाठवण्यात आली. अपेडाद्वारे या केळी चाचणी शिपमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून युरोपमध्ये केळीच्या मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. वासुंदे येथून एकूण २० मेट्रिक टन केळी ४० फूट कंटेनरच्या माध्यमातून रवाना करण्यात आल्या. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मार्फत सागरी वाहतुकीद्वारे या केळी युरोपला पाठवण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला नवी दिल्ली येथील अपेडाच्या ताजी फळे आणि भाजीपाला विभागाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशु, विभागीय कार्यालय मुंबईचे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, विभागीय प्रमुख, राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी, आयएनआय फार्म्सचे कर्मचारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना चालना देण्यासाठी अपेडा मोलाची कामगिरी करीत असून त्याचाच एक भाग हा कार्यक्रम आहे. युरोपमध्ये केळीची ट्रायल शिपमेंट पाठवणे हे या प्रयत्नातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. अशा प्रकारची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व युरोपीय बाजारपेठेत तसेच जगभरात भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी अपेडा सक्रियपणे काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

%d