अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाचा अमृत कलश दिल्लीत कर्तव्य पथावर
पुणे : ‘ मेरी माटी मेरा देश ‘ या उपक्रमांतर्गत अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाने संकलित केलेल्या १५ गड किल्ल्यांवरील वीरांच्या रक्ताने पावन झालेल्या मातीचा अमृत कलश दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत माती सह सेल्फी फोटोचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले जाणार आहे. यामध्ये अप्पासाहेब जेधे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक ११ हजार सेल्फी फोटोचे संकलन आहे.
श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले तसेच खजिनदार जगदीश जेधे यांनी अमृत कलश संकलनासाठी व अमृत कलश दिल्लीकडे रवाना करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी पाचरणे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सीमा ढमे, डॉ. रजनी जरांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत संकलित केलेल्या मातीचा अमृत कलश घेऊन महाविद्यालयातील जिल्हा समन्वयक डॉ. अमित गोगावले, डॉ.विशाल गायकवाड, अधिकारी डॉ. संतोष यादव दहा स्वंयसेवकांसह दिल्ली कर्तव्यपथावर दाखल झाले. महाराष्ट्र भरातून आलेल्या सर्व अमृतकलशांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले या अमृत कलशातील मातीतून दिल्लीमध्ये अमृत वाटिका उभारली जाणार आहे. या उपक्रमासाठी ‘मेरी माटी मेरा देश, या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माननीय राजेश पांडे कार्यक्रम समन्वयक डॉ.सदानंद भोसले व प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी विद्यार्थी व महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या.
