नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतीय तत्वज्ञान या विषयावर चर्चासत्र
पुणे : संपूर्ण देशात नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले जात आहे. त्यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय तत्वज्ञावर आधारित विषय शिकवले जाणार आहेत. या विषयांचा अभ्यासक्रम आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यूजीसी तर्फे देशभरात घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील भक्तिवेदांत संशोधन केंद्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षण क्षेत्रामधील अनेक विद्वान आणि मान्यवर प्राध्यापकांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. भक्तिवेदांत केंद्राचे अधिष्ठाता डॉ. जनार्दन चितोडे, केंद्राचे संस्थापक विश्वस्त गौरांग दास, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, विद्यापीठ तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. श्रीधर आकाशकर, भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. कोंडीराम धुमाळ, संशोधन केंद्राचे संचालक संजय भोसले उपस्थित होते. .संशोधन केंद्राचे सचिव भूषणकुमार चौधरी यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.
सुरेश गोसावी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये भारतीय तत्वज्ञानावर आधारित दोन विषय शिकविण्याचे सुचविले. भक्तिवेदांत संशोधन केंद्र आणि विद्यापीठातील तज्ज्ञांच्या समितीने त्यात लक्ष घालावे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. जनार्दन चितोडे म्हणाले, भक्तिवेदांत संशोधन केंद्र अस्सल भारतीय तत्वज्ञान, संस्कृती, नाट्य, संगीत आणि कला यामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण करते. हे केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असून देश विदेशातील अनेक संस्थांबरोबर त्यांचे संशोधन आणि प्रशिक्षण कार्य सुरु आहे.
गौरांग दास म्हणाले, क्षमता आणि शिक्षण असूनही युवकांना वास्तव हाताळता येत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास, शोषण वृत्ती यांसारख्या अनेक समस्यांवर मूळ भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रशिक्षण हाच एक उपाय आहे. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम दास यांनी उत्तम चारित्र्य, सेवावृत्ती, चांगल्या सवयी युवकांसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितले.
