Maratha Reservation : आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली
मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील याच्या उपोषणाला आठवडा झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अधिकाधिक तापत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आता याची धग आता थेट मंत्रालया पर्यंत पोहोचली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
आकाशवाणी आमदार निवास इथे असलेली मुश्रीफांची गाडी मराठा तरुणांनी फोडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली. हसन मुश्रीफ यांच्या ताफ्याती गाडीची तोडफोड झाल्यानंतर त्यांच्या कागल इथल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरून तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौजफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आत सोडलं जात आहे. तसंच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवसास्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत, त्या मरिन लाईन्स पोलीस स्थानकात नेण्यात आल्या आहेत.
गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ म्हणाले की, मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळणं हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
