मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणारच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभारातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. तसंच मराठा समाजालाही टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं. शिंदे यांनी दसरा मेळाव्याचं भाषण मध्येच थांबवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. ‘एकनाथ शिंदे शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता, कारण हे सगळे समाज बांधव आपले आहेत’, हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होऊन सांगतो, असं मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजानने टोकाचं पाऊल उचलू नका, आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २६ जुलै २००५ च्या महापुरात बांद्र्यात सगळीकडे पाणी भरलं होतं. पण मातोश्रीमध्ये बाळासाहेबांना एकटे सोडून तुम्ही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात. बाळासाहेबांना तिथे पाण्यात मातोश्रीवर सोडून तुम्ही गेलात, तुम्ही बाळासाहेबांचे होवू शकत नाहीत ते तुमचे आमचे काय होणार. यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.
पुढे शिंदे म्हणाले की, एकदा का त्यांनी ठरवलं की एखाद्याचा काटा काढायचा की ते बरोबर काढतात. त्याची उदाहरणं मी देऊ इच्छीत नाही. रामदास कदम इकडे आहेत, मनोहर जोशी तिकडे आहेत. पण एकच सांगू इच्छीतो, धर्मवीर आनंद दिघे यांनी राज ठाकरे एवढी मेहनत करतायत म्हणून एका बैठकीत त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले. लगेच दिघे साहेबांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या पद्धतीने वागवलं त्याचा मी साक्षीदार आहे. अपघात झाल्यावर ते बघायला आले नाहीत, अंतयात्रेला आले नाहीत. समाधीला देखील आले नाहीत.
मी गेलो, तर मला विचारलं आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस त्याच्याकडे काय प्रॉपर्टी असणार? तुम्ही मर्द आहोत असं म्हणता, हे सांगावं का लागतं? ही सभा बाळासाहेबांच्या मर्द शिवसैनिकांची आहे. तिकडे आहे ती हुजरे आणि कारकून यांची आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
