Saturday, June 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘संजय राऊतच ‘ऑपरेशन उबाठा बुडवा’चे सूत्रधार’; खासदार डॉ. ज्योती वाघमारेंचा घणाघात

पुणे, दि. २७ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत असून, पक्षातील नेते आणि कार्यकर्ते दुरावण्यामागे त्यांच्या भाषाशैलीचाच मोठा वाटा असल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला. पुण्यातील सारसबागेसमोरील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थित होते.
डॉ. वाघमारे म्हणाल्या की, ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते कथित “खोक्यांमुळे” पक्ष सोडून गेले नसून, पक्षातील असुरक्षित वातावरण, नेतृत्वाचा अभाव आणि संजय राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांमुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. विरोधकांनी नव्हे, तर स्वतः संजय राऊत यांनीच आपल्या बेताल वक्तव्यांमधून “ऑपरेशन उबाठा बुडवा” सुरू केल्याचा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक पत्रकार परिषदेत राऊत हे स्वतःच्या पक्षाची प्रतिमा अधिकच खालावत असल्याचेही त्या म्हणाल्या.
संजय राऊत हे आता ठाकरे गटाचे प्रवक्ते नसून काँग्रेसची राजकीय भूमिका मांडणारे “सुपारीबाज प्रवक्ते” बनले असल्याचा आरोप करत, महाराष्ट्राच्या विकासावर बोलण्याऐवजी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर वैयक्तिक टीका करण्यातच वेळ घालवत असल्याचे वाघमारे म्हणाल्या. महिलांबाबत अवमानकारक भाषा आणि विरोधकांविषयी अपशब्दांचा वापर करून ते राज्यातील राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना वेग मिळाला असून, त्याला उत्तर देता येत नसल्यामुळेच विरोधकांकडून निराधार आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवर टीका करताना, जनतेने नाकारलेल्या नेतृत्वाकडून मार्गदर्शन मिळू शकत नाही. स्वतःच्या पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणे हा केवळ राजकीय दिखावा असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यांचे समर्थन करतात का, याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही डॉ. वाघमारे यांनी केली. महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचा उल्लेख केला. मात्र, महिलांच्या सन्मानाबाबत भूमिका घेण्याचा दावा करणाऱ्या ठाकरे गटाने संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर मौन बाळगणे हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांना महाराष्ट्रातील सुजाण जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading