मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर
मुंबई – ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या २७ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांच्या हस्ते डॉ. दातार यांना दिला जाणार आहे. गिरगावमधील डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ ही सन १९३५ मध्ये स्थापन झालेली ख्यातनाम जुनी संस्था मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, नाट्य या क्षेत्रांत कार्यरत आहे. तिच्यातर्फे मराठी विश्वातील विवीध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी व्यक्तींना दरवर्षी ‘मराठी यशवंत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. रोख २५,००० रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी हा पुरस्कार चित्रपट व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव चितळे, उद्योजक सुभाष दांडेकर, संगीतकार यशवंत देव, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अशा नामवंतांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. दातार हे साहित्य संघाच्या यंदाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते चार साहित्य पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. यावेळी डॉ. दातार बीजभाषण करणार असून ‘उद्योगक्षेत्रातील माझे अनुभव’ या विषयावर मनोगत व्यक्त करतील.
जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या ३९ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ५० सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.
डॉ. धनंजय दातार यांची यशोगाथा उद्योगाची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी, तसेच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. गरीबीत बालपण गेलेल्या धनंजय यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाचा मुकाबला केला आहे. कोणताही उद्योजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत फिनेल व इन्स्टंट मिक्सेस विक्रीचा व्यवसाय करताना विक्रीकला व ग्राहकसेवा कौशल्य आत्मसात केले. वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या छोट्याशा दुकानात झाडू-पोछा, लादी सफाई, ५० किलोंची पोती पाठीवर वाहून नेणे अशा कामांतून कारकीर्दीची सुरवात केली. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि कष्टाळू वृत्ती या जोरावर त्यांनी एका छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर बहुराष्ट्रीय उद्योग समूहात करुन दाखवले. त्यामुळे दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.
व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते नेहमीच तरुणांना देतात. हाच प्रामाणिकपणा दातार यांनी मागील ३९ वर्षे आपल्या व्यवसायात कायम ठेवला. यामुळे त्यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या प्रतिष्ठित मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.
डॉ. दातार यांनी विविध संस्थांना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. त्यांना सामाजिक उद्योजकतेतील योगदानासाठी मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’ समूहाने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) पोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अदील’ समूहाची ५० सुपर मार्केट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत कार्यरत आहे.
