Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

जैवविविधता आणि पर्यावरणावरच उद्याचे भविष्य अवलंबून – डॉ. माधव गाडगीळ

पुणे : महाराष्ट्राच्या पर्यावरणावर आणि त्याच्या विकासावर होणारा परिणाम हा अत्यंत बारकाईने आम्ही अभ्यासला आणि त्या संदर्भात पश्चिम घाट संवर्धन अहवाल तयार केले. हे अहवाल विविध भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचावे, अशी आमची अपेक्षा होती. जैवविविधता आणि पर्यावरण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून त्यावरच उद्याचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे जैवविविधता संवर्धनासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

माधव गाडगीळ यांचे सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी हे आत्मचरित्र नुकतेच नऊ भाषांमध्ये प्रकाशित झाले, यानिमित्त पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे माधव गाडगीळ यांची या पुस्तकाविषयी गुरुदास नूलकर आणि डॉ. विजय एदलाबादकर यांनी मुलाखत घेतली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक रवी पंडित, आय.सी.एम. आर. चे माजी संचालक डॉ. गुप्ते, पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सहकार्यवाह डॉ. पी.एन. जोशी, रोहित जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री राजीव मराठे, रवींद्र चौधरी, केतनकुमार पाटील, स्वाती ताडफळे, शुभांगी केळकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, इरावती कर्वे, डॉ. सलीम अली, सतीश धवन, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासारख्या महान व्यक्तींचा सहवास लाभल्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. मी रोडसाईड अभ्यासक नाही, तर पूर्णतः संशोधक आहे आणि त्याचा मला आनंद व अभिमान आहे. मी विद्यार्थी असताना अनेक वाईट अनुभव आले. कोणताही अभ्यास न करता स्वतःचे नाव विद्यार्थ्यांच्या संशोधनावर लावणारे शिक्षक आजही उपलब्ध आहेत. अशा शिक्षकांमुळे फार मोठे नुकसान होत आहे.

अमेरिकेतून भारतात परत आल्यानंतर मला येथे ज्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे शास्त्रज्ञ म्हणून मला अतिशय समाधान वाटते. अमेरिकेमध्ये केवळ एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा मी प्राध्यापक म्हणून राहू शकलो असतो, परंतु भारतामध्ये मी पंतप्रधानांचा पर्यावरण विषयक सल्लागार या पदापर्यंत काम करू शकलो आणि माझ्या कामाचा समाजालाही उपयोग झाला, याचा मला अत्यंत आनंद आहे.

ते पुढे म्हणाले, वन्यजीव प्राणी आणि मनुष्य हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शिकारीवर पूर्णतः बंदी घातली जाणे, हा त्यावरील उपाय नाही. वन्यजीवांमुळे ज्यांचे जीव गेले त्यांच्या कुटुंबीयांचाही विचार केला जाणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

माधव गाडगीळ यांचा परिचय राजीव मराठे यांनी, नूलकर आणि एदलाबादकर यांचा परिचय स्वाती ताडफळे यांनी करून दिला. डॉ.प्रसाद जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन रोहित जोगळेकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading