आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाला ‘लिहिणाऱ्यां’कडून उत्साही प्रतिसाद
पुणे : मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यापासून, ते आजच्या डिजिटल युगातल्या ‘की बोर्डपर्यंत.. ‘लेखना’ने केलेला प्रवास मनोरंजक आहे. गुहेच्या भिंती, दगड, भुर्जपत्रे, ताडपत्रांपासून धातूच्या पत्र्यांपर्यंतचे वैविध्य त्यात आहे. ‘की बोर्ड’ ही सोय असली, तरी पेनाने लिहिलेली दोन वाक्ये दोन माणसांनाच नव्हे तर दोन संस्थांपासून ते दोन देशांनाही परस्परांना जिव्हाळ्याने जोडू शकतात, याचा प्रत्यय देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाला पुणेकरांनी उत्साही प्रतिसाद दिला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांपर्यंत, अनेक मान्यवरांनी पेन महोत्सवाला भेट देत खरेदीची पर्वणीही साधली आहे.
पुण्यातील रायटिंग वंडर्स या संस्थेच्या वतीने जगभरातील एक्सक्लुझिव्ह व प्रीमियम ब्रँड्सच्या पेनांचा आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव एरंडवणे, डी पी रस्त्यावर सिद्धी (साज) गार्डन आणि बँक्वेट्स येथे सकाळी १० ते सायं ८ दरम्यान सुरू झाला असून, रविवारपर्यंत हा पेन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
महोत्सवाचे हे ७ वे वर्ष असून आज सकाळी भाजप राष्ट्रीय महिला मंचाच्या उपाध्यक्षा डॉ मेधा कुलकर्णी, बी यु भंडारी ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश भंडारी, रायटिंग वंडर्स संस्थेचे सुरेंद्र करमचंदानी, प्रो यशवंत पिटकर, युसुफ मन्सूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. या पिटकर आणि युसुफ मन्सूर यांचे मार्गदर्शनही यावेळी उपस्थितांना लाभले.
उद्घाटनावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “आजच्या युगात प्रत्येक गोष्टीची जागा ही तंत्रज्ञानाने घेतली असली तरी या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला आनंद होत आहे. लोकांना अजूनही त्यांच्या मुळाशी जोडलेले राहायचे आहे, याचाच हा एक पुरावा आहे असे मला वाटते. पेनचे सर्वांशी भावनिक नाते आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले.”
फाउंटन पेनाच्या नीबवर कोरीवकाम करणारे प्रसिध्द कलाकार गौरव कपूर यांची कार्यशाळा महोत्सवात संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मागील १८ वर्षांहून अधिक काळ मी दागिन्यांच्या व्यवसायात असल्यामुळे, मला नेहमी धातूंवर गुंतागुंतीचे कोरीव काम करणे सवईचे आहे. खरेतर त्यामुळेच नीबवर कोरीवकाम करण्याची माझी आवड मला गवसली. आज सोन्याच्या नीबांना सर्वाधिक मागणी असून त्याखालोखाल स्टील नीबांना मागणी आहे.”
महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ७५ पेक्षा जास्त जागतिक दर्जाचे पेन ब्रँड्स आम्ही प्रदर्शित केले असून वेगवेगळ्या श्रेणीतील नवीन, विंटेज आणि लिमिटेड एडिशन असलेली अनेक प्रकारची फाउंटन पेन्स, बॉलपेन्स व रोलर पेन्स पुणेकरांना पाहता येतील. याबरोबर विविध प्रकारच्या ब्रँडसच्या रायटिंग नोटबुक्स, पेन पाऊचेस, पेन होल्डर्स व इतर अॅक्सेसरीज देखील महोत्सवात असणार आहेत. या महोत्सवात पुणेकरांना गणपती आणि शंकर यांच्या चित्रांचे कोरीवकाम केलेल्या नीब पहायला मिळतील. याबरोबरच २४ कॅरेट सोन्याचा मुलामा असलेल्या ‘अयोध्या’ पेन सेट’, राम व हनुमानाच्या आकृत्या रेखाटलेले पेन पाहता येईल.”
महोत्सवात १५० वर्ष जुन्या ब्रिटनस्थित ब्रँडच्या शाईचे १४० रंगप्रकारही आहेत. ही शाई उच्च-गुणवत्तेची असून ब्रिटन आणि अमेरिका अध्यक्षांसोबतच रॉयल फॅमिलीद्वारे या शाईचा वापर केला जातो. हस्तलिखीते व लग्नपत्रिकांसाठी वापरण्यात येणारी विशेष शिमर शाई, विविध कॅलिग्राफी आणि ड्रॉइंगसाठी वापरण्यात येणरी शाई देखील पाहता येणार आहे.
महोत्सवात पु.ल. देशपांडे सिग्नेचर पेन, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन, खास लहान मुलांसाठी चिंटू पेन, लॅमी, पायलट, ऑरोरा, अरिस्ता, क्रॉस, बीना, कोंक्लीन, डिप्लोमॅट, क्लिक, पार्कर अशा विविध ब्रँडसचे फाउंटन पेन याबरोबर रोलर पेन, मॅकेनाईज्ड पेन्सिल्स, विशेष रॅडेन आणि अगदी अंड्यांच्या टरफलांपासून बनविलेले पेन देखील पहायला मिळणार आहेत.
या दोन दिवसीय महोत्सवादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पुणे अर्बन स्केचर्स, संस्कार भारती यांचे सदस्यही सहभागी होतील. बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून विविध प्रकारे स्वाक्षरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पेन दुरुस्तीचे प्रात्यक्षिक दाखवणारे पेन डॉक्टर्स महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असेल. प्रदर्शनात लकी ड्रॉच्या माध्यमातून १० जणांना प्रीमियम पेन भेट म्हणून दिला जाईल. तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक २५ व्या शालेय विद्यार्थ्याला एक ‘चिंटू’ एक्झाम पॅड भेट दिला जाणार असल्याचेही करमचंदानी यांनी सांगितले.
