ICC World Cup: भारताचा सलग चौथा विजय
पुणे : एमसीए गहुंजे स्टेडीयमवर पुणेकर प्रेक्षकांची मने जिंकत य क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेतला सलग चौथा विजय नोंदवत हल्लाबोल केला. विजयासाठी मिळालेल्या २५७ धावांचा पाठलाग भारताने ४१.३व्या षटकात पार करीत कोहलीनेही आपले शतक पूर्ण केले.
आज गहुंजे स्टेडीयमवर विराट कोहलीने आणखी एक शतकी खेळी खेळली. २०१७ साली मोठ्या धावांचा पाठलाग करताना याच मैदानावर त्याने शतक ठोकले होते. आजही तशीच दमदार करीत कोहलीने सामन्यावर पकड मिळवली.
सपाट पिचवर भारताच्या कसलेल्या फलंदाजीसमोर २५७ धावांचे लक्ष म्हजे जणू सोपा पेपरच. सलामीवीर रोहित शर्मा (४८) आणि शुभमन गिल (५३) यांच्या आक्रमक ८८ धावांच्या भागीदारीने मधल्या फळीतील फलंदाजांचा ताण कमी केला. रोहित आपल्या रंगात आला असताना सलग दुसरा पूल शॉट मारताना बाद झाला. गिलही अर्धशतक ठोकल्यानंतर मेहदी हसन मिराझच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. श्रेयस अय्यरने (१९) गरज नसताना डीप मिड विकेटला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. दुसरीकडे विराट कोहलीने नेहमीप्रमाणे एका बाजूने किल्ला सांभाळत आणखी एक दमदार शतक ठोकत भारताला विजयश्री खेचून आणले.
जखमी कर्णधार शकीब अल हसन आणि अनुभवी गोलंदाज तस्कीन अहमद यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या बांगलादेशने यजमान भारताला टक्कर देण्यासाठी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावला. पहिल्या पाच षटकांत केवळ १० धावा करीत सावध सुरुवातीनंतर तंझीद हसन (५१) व लीटन दास (६६) या सलामीवीरांनी प्रत्येकी अर्धशतकीय खेळी करीत ९३ धावांची भागीदारी रचली. पण भारताकडे असलेल्या अनुभवी माऱ्याने एका पाठोपाठ विकेट्स काढीत एक बाद ९३ वरून पाहुण्यांची अवस्था चार बाद १३७ केली. मधल्या षटकांत मुस्ताफिकुर रहीम (३८) व महमुदुल्ला (४६) यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने २५६ धावांचा पल्ला गाठला. सिराज, बुमरा, जडेजा यांनी प्रत्येकी दोन तर शार्दुल ठाकूर व कुलदीप यांनी एक-एक गडी बाद करीत बांगलादेशला पुण्याच्या सपाट खेळपट्टीवर मोठ्या धावसंखेपासून रोखले.
दरम्यान, नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पायाने चौकार अडवण्याच्या नादात हार्दिक पंड्याचा पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागेल. बीसीसीआयने यावर प्रतिक्रिया देत हार्दिकला स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवल्याचे सांगितले.
