Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

स्त्री साहित्यात लैंगिक जाणिवांचा आणि  राजकारणाच्या भानाचा अभाव : डॉ. गीताली वि. म. 

पुणे : स्त्रीवाद ही राजकीय जाणीव  आहे. स्त्रीवाद म्हणजे  स्त्री  विरुद्ध पुरुष  असा संघर्ष  नाही. पुरुषसत्ताक पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध हा लढा आहे. आज स्त्रियांचे साहित्य अनेक विषयांना स्पर्श करत असले तरी त्यात लैंगिक जाणिवांचा आणि  राजकारणाच्या भानाचा अभाव आहे. असे मत मिळूनी साऱ्याजणीच्या संपादिका आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्त्रीजाणिवा आणि स्त्री मुक्तीच्या कवितांचा जागर ‘कविता दुर्गेच्या’ या कवयित्रींच्या काव्य संमेलनात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रभारी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, ज्योत्स्ना  चांदगुडे, धनंजय तडवळकर उपस्थित होते. प्रा.जोशी म्हणाले, साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद आजवर अनेक महिलांनी भूषविले पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकाही महिलेने आजवर भूषविलेले नाही याचे चिंतन पुरोगामित्वाचा आव आणणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवे. आजची मराठी कविता अतिशय प्रभावीपणे जगण्याचा कोलाहल आणि अस्वस्थ वर्तमान टिपते आहे.तिच्या आशयात, रुपात आणि भाषेत क्रांतिकारी बदल झाले आहेत. आजची कविता इझमच्या जोखडातून मुक्त झाली असून ती माणूसपणाचाच विचार करणारी आहे.    
 
या कविसंमेलनात  कवयित्री अंजली कुलकर्णी, मीरा शिंदे, सुनीति लिमये, मीना शिंदे, योगिनी जोशी, प्रतिभा पवार, संध्या वाघ, ज्योत्स्ना  चांदगुडे, मृणालिनी कानिटकर, वैशाली मोहिते, प्राजक्ता पटवर्धन, प्राजक्ता वेदपाठक, आरती देवगावकर, संध्या गोळे,  प्रभा सोनवणे, चंचल काळे, वर्षा कुलकर्णी, निरुपमा महाजन, कविता क्षीरसागर, जयश्री श्रोत्रीय सहभागी झाल्या होत्या. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चिन्मयी चिटणीस यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading