Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

व्यावसायिकतेमुळे खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला – अंजली भागवत

पुणे – ‘विविध खेळांना व्यावसायिकता प्राप्त झाल्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे,’ असे मत अर्जून पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली भागवत यांनी व्यक्त केले. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. नवरात्र तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी (१६ ऑक्टोबर) विविध खेळातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आर्यनमॅन ऋतुजा उडपीकर, फिटनेस प्रभावक सोनाली तळावलीकर यांचीही मुलाखत घेण्यात आली.  (Professionalism has changed the way we look at sports – Anjali Bhagwat)

‘आमच्यावेळी शिक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य मिळायचे, अभ्यासातून जर वेळ मिळाला तरच खेळ किंवा इतर छंद जोपासता येत होते. मात्र आता तस होत नाही, पालक अधिक जागृत झाले असून खेळ किंवा छंद शिक्षणाचाच भाग असल्याचे ते मानतात. तसेच केंद्र आणि राज्य शासनाने उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे खेळांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात झाली आहे, असेही अंजली भागवत म्हणाल्या. तर ट्रायथॉन हा एक एंड्यूरंस स्पोर्ट असून त्यासाठी शरीरिक क्षमतांसोबत मानसिक क्षमताही पणाला लागत असल्याचे आर्यनमॅन विजेता ऋतुजा उडपीकर यांनी सांगितले. ‘सध्या प्रचलित असलेल्या फिटनेस फॅडचे बळी न पडता तुम्हाला ज्यात आवड आहे त्या गोष्टीपासून व्यायामाला सुरुवात करा आणि हळूहळू तुमची क्षमता वाढवा तसेच अशक्य गोष्टी आत्मसाद करण्यापेक्षा तुमचे शरिर जे सांगते ते ऐकून त्यानुसार वागा,’ असा सल्ला फिटनेस प्रभावक सोनाली तळावलीकर यांनी उपस्थितांना दिला.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. वृषाली रणधीर यांच्या ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने करण्यात आली होती. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, क्रीडा विभागाच्या डॉ. सुमन पांडे-महादेवन उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर यांनी केली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यावाणीच्या निर्मात्या श्रीयोगी मांगले तसेच ऋचा नामजोशी यांनी केले. शुक्रवार (२० ऑक्टोबर) पर्यंत चालणाऱ्या चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading