Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

आता आपण आयुर्वेदाच्या सुवर्णकाळाकडे पोहोचत आहोत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

पुणे : आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन यापूर्वी खूप मोठा नव्हता. पण आता केंद्र सरकारच्या पुढाकारानी आयुर्वेदाचा दबदबा वाढला आहे. पूर्वीच्या ग्रंथात अनेक गोष्टी चांगल्या लिहिल्या आहेत. त्या अभ्यासून आता आपण आयुर्वेदाच्या सुवर्णकाळाकडे पोहोचत आहोत, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

परिवर्तन संस्था पुणे तर्फे परिवर्तन नेत्र रक्षक पुरस्कार २०२३ प्रदान सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. मधुसूदन झंवर, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, स्वरूपा गुजर, डॉ. राजेश पवार यांच्या मातोश्री स्नेहलता पवार आदी उपस्थित होते. तब्बल ६० हजार मोफत व ३० हजार व्यवसायिक नेत्रशस्त्रक्रिया कर्ता असलेले डॉ. राजेश पवार यांना परिवर्तन नेत्र रक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानेश्वरी पगडी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, पेटंट व नवीन तंत्रज्ञानामुळे आयुर्वेदाच्या वारशाचे जतन आज होत आहे. आयुर्वेदाकडे विज्ञानवादी पद्धतीने पाहण्याची दृष्टी देखील वाढली आहे. माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या पैलूला स्पर्श करणारे काम डॉ. राजेश पवार यांनी केले आहे. समाजात कामे करताना मी जे पाहिले, त्यानुसार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणे सोपे नाही. त्यामुळे हे काम मोठे असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. राजेश पवार म्हणाले, बीएमएस असलेले डॉक्टर नेत्रशस्त्रक्रिया करू शकतात, ही प्रेरणा मला डॉ. पारस शहा यांच्याकडून मिळाली. नेत्र चिकित्सा करताना आधुनिकतेचे मला फार आकर्षण होते. त्यामुळे मी अनेक आधुनिक गोष्टींचा अंगीकार करत गेलो.

डॉ. शैलेश गुजर म्हणाले, परिवर्तन संस्था ही परिवर्तनाच्या माध्यमातून काम करते. कर्तृत्ववान व्यक्तींचे कौतुक करणे हे नेहमीच गरजेचे असते. त्यामुळे डॉ. राजेश पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचा आपण सन्मान करत आहोत. आपले शास्त्र आणि त्या व्यक्तीची मेहनत ही लोकांच्या समोर यावी, हा यामागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. बाळकृष्ण कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ईशा गुजर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading