नाविन्याचा शोध आणि बदलांचा सातत्याने स्वीकार ही मारुती पाटील यांची वैशिष्ट्ये; नाना पाटेकर यांचे प्रतिपादन
पुणे : अवहेलना, अपमान, विवंचना वाट्याला आल्या. भयानक अपघातात एक पाय गमवावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीने जे शिकवले, त्यातून मारुती पाटील यांच्या चित्रांना विषय सापडले, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार नाना पाटेकर यांनी शुक्रवारी केले. नाविन्याचा शोध आणि बदलांचा सातत्याने स्वीकार ही पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत, असेही ते म्हणाले.
जेष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य मारुती पाटील लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘रंग रेषांचे सोबती’ या सचित्र मराठी व इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. लॉ कॉलेज रस्त्यावरील भांडारकर इन्स्टिट्यूट मधील अॅम्फिथिएटर येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी ज्येष्ठ पत्रकार- साहित्यिक विजय कुवळेकर, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर, मारुती पाटील, त्यांच्या मुली बरखा आणि तेजस पाटील याबरोबरच मारुती पाटील यांचा विद्यार्थी परिवार, स्नेही उपस्थित होते. या पुस्तकाच्या निमित्ताने एका निसर्गप्रेमी कलाकाराचे आत्मकथन त्याच्या सुंदर कलाकृतीसह रसिकांच्या भेटीला आले.
जेजेमधूनच माझ्या चित्रांची आणि नाटकाची सुरुवात झाली. आपल्याला अभिनय येतो, हे तिथे कळलं, असे सांगून नाना पाटेकर यांनी गतस्मृतींना उजाळा दिला.
‘परिस्थिती जे शिकवते, ते कोणी शिकवू शकत नाही. अपघातामुळे विवंचना, अपमान, अवहेलना वाट्याला आल्यामुळे मारुती पाटील यांनी वेगळे चित्रविषय हाताळले. बदलत्या काळानुसार स्वतः बदलणे आणि सतत नाविन्याचा शोध गरजेचा ठरतो. तो पाटील यांनी घेतला. आपले व्यक्त होण्याचे नेमके माध्यम त्यांनी रंगरेषांतून निवडले. मी ते अभिनयातून निवडले, असे पाटेकर म्हणाले.
ज्येष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर म्हणाले, “मारुती यांच्या चित्रांत कामाविषयी विलक्षण आत्मीयता आहे. कुठल्याही प्रसंगी धैर्य आणि शांतता ते ढळू देत नाहीत. या शांततेतूनच त्यांच्या उत्तम चित्रांची निर्मिती झाली असावी.”
विजय कुवळेकर म्हणाले, “रेल्वे अपघातात पायावरून रेल्वे जाते, पायाचा चक्काचूर होतो, तरी यावर मात करून ते उभे राहिले. त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या चित्रातही दिसतो. ते दुःखाचे भांडवल करत बसले नाहीत. विद्यार्थ्यांना शिकवण्यात, अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग त्यांनी केले.” कृतज्ञता, सकारात्मकता आणि संवेदनशीलता या बाबी पुस्तकात दिसतात. कारण त्या मुळात मारुती पाटील यांच्या लेखनात आहेत. श्रेय न घेता ते नोंद करतात. कृतज्ञतेचा धागा जपतात. कृतज्ञता आणि कृतार्थता त्यांना सातत्याने लाभत राहो, असेही त्यांनी सांगितले.
रसिकांनी संवाद साधताना पाटील म्हणाले, “मी माझा जीवनप्रवास मांडला आहे. जे वाट्याला आले, त्याची खंत नाही. मी स्वीकार करत गेलो. आनंद घेत देत गेलो. माझ्या वाटचालीत गुरू कुलकर्णी सर, पत्नी, कुटुंबातील सदस्य, माझे सहाध्यायी, विद्यार्थी आणि कलालसिकांचे महत्त्वाचे स्थान आहे.
जे जे स्कूल मध्ये स्टडी टूरसाठी जयपूर येथे असताना हवामहल या प्रसिद्ध वास्तूचे वेगळ्या कोनातून चित्रांकन करायचे होते. पण नेमकी जागा मिळेना. शेवटी जवळच्या पोलिस चौकीत बसून कोन साधला. सुरवातीला अलिप्त वागणाऱ्या पोलिसांनी नंतर माझे चित्र पाहून माझी चांगली बडदास्त ठेवली, अशी आठवण मारुती पाटील यांनी सांगितली.
पाटील यांच्या कन्या बरखा यांनी प्रास्ताविक केले. तेजस पाटील यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. योगेश देशपांडे यांनी पाटील यांनी लिहिलेल्या पुस्ताकातील काही भागाचे अभिवाचन केले आणि पाटील यांची प्रकट मुलाखत घेत यांच्याशी संवाद साधला.
