Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

भारत- कोरिया राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कोरियन कला प्रदर्शनाला सुरुवात

पुणे : भारत आणि कोरिया आपल्या राजनैतिक संबंधांची ५० वर्षे पूर्ण करीत असताना सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) आणि कोरियाचे के आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरियन कला प्रदर्शनीला आजपासून सुरुवात झाली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह या ठिकाणी आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन के आर्ट इंटरनॅशनल एक्सचेंज असोसिएशनच्या अध्यक्ष हिओ सूक, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू प्रो. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगदाळे, आर्ट पुणे फाउंडेशनचे संजीव आणि प्रियंवदा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. शनिवार दि १४ व रविवार दि १५ ऑक्टोबर, २०२३ असे दोन दिवस हे प्रदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संत ज्ञानेश्वर सभागृह या ठिकाणी सकाळी ११ ते सायं ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. सदर प्रदर्शनासाठी आर्ट पुणे फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

प्रदर्शनामध्ये कोरियातील सुप्रसिद्ध ३० चित्रकारांचे ८० मास्टरपिसेस पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहेत. हे सर्व चित्रकार यावेळी प्रदर्शनीदरम्यान उपस्थित असणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही यावेळी रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील नागरिकांना या निमित्त कोरियन कलाकार आणि कोरियन संस्कृती यांची जवळून ओळख तर होईलच शिवाय आपल्या येथील कलाकारांना त्यांच्याशी कलात्मक संवाद साधता येईल याचा आनंद आहे असे यावेळी आयोजकांनी सांगितले. विद्यापिठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संत ज्ञानेश्वर सभागृहात कलेशी संबंधित एखादे प्रदर्शन होत आहे, यासोबतच पहिल्यांदा एसटीपी सारखा विभाग यामध्ये संलग्नपणे काम करीत आहे अशी माहिती जगदाळे यांनी दिली.

प्रदर्शनात कला प्रकारांचे विविध प्रकार आणि शैली अनुभविता येणार असून यामध्ये अमूर्त, लँडस्केप, प्रभाववादी, समकालीन चित्र शैलींचा समावेश असेल. ही सर्व चित्रे तैल, जलरंग, ऍक्रेलिक, थ्री डी आणि संमिश्र माध्यमातील असणार आहेत. कला संग्राहकांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरेल. किम इनजून हे सदर कला प्रदर्शनाचे संचालक असून सचिन गुप्ता आणि पार्क सोयुंग हे क्युरेटर म्हणून काम पाहणार आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading