राष्ट्रीय पातळीवरील रोबोटेक्स स्पर्धेत पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विजेतेपद, एस्टोनियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पुणे : रोबोटेक्स इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२३ मध्ये पुणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवत एस्टोनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा एस्टोनियातील तालिन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता फेरी होती.
मुलांमध्ये स्टेम पद्धतीद्वारे रोबोटिक्स विषयाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या रोबोटेक्स इंडिया या ना-नफा तत्त्वावरील संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रोबोटिक्सच्या विश्वात सहभाग घेण्याची संधी मिळाली. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता, त्यामुळे सर्वसमावेशकता आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले होते. देशाच्या वैविध्यपूर्ण विद्यार्थी संघटनाचे प्रतिबिंब, यात दिसून आले.
या स्पर्धेबद्दल बोलताना, रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या, "रोबोटेक्स इंडियामध्ये, आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक क्षेत्रातील त्यांच्या भविष्यातील विजयासाठी सक्षम बनवण्याची मोहीम राबवत आहोत. त्यासाठी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यावर आम्ही भर दिला आहे. ही अजिंक्यपद स्पर्धा हा त्याचाच एक पुरावा आहे. विविध स्तरावरील विद्यार्थ्यांमधील नवोन्मेषाच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना साकार करण्यासाठी पाठबळ देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक अशा दोन्ही क्षेत्रांत पातळीवर त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी एक समान आणि लिंगभेद विरहित व्यासपीठ प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर 'शिक्षण ते रोजगारातील अंतर' दूर करणे शक्य होईल, असा आमचा विश्वास आहे."
रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धेचे प्रमुख प्रीत नोराक म्हणाले, रोबोटेक्स इंटरनॅशनल रोबोटिक्स विष्यातील स्पर्धांद्वारे जगभरातील मुलांना या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. भविष्यातील कौशल्यांसह तरुणांना सक्षम बनवण्याचा आमचा उद्देश आहे. रोबोटेक्स इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या अतुलनीय कौशल्याला सातत्याने संधी मिळत असून, रोबोटिक्समध्ये सातत्यपूर्ण यश मिळवणे शक्य होत आहे. या स्पर्धा नवकल्पना आणि युवा सशक्तीकरणाच्या वचनबद्धतेची साक्ष देतात. रोबोटेक्स इंडियाच्या उत्तम यशाबद्दल आम्ही पायल राजपाल आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानतो."
या वर्षीची ही राष्ट्रीय स्पर्धा एस्टोनियातील टालिन येथे होणाऱ्या आगामी रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता फेरी होती. यास्पर्धेत लेगो लाईन फॉलोअर, लाईन फॉलोअर, रोबो सुमो, मेझ सॉल्व्हर, एंटरप्रेन्युअरशिप चॅलेंज, गर्ल्स फायर फायटिंग आणि ड्रोन फ्लाइंग अशा अनेक श्रेणींचा समावेश होता. या विविध श्रेणींमुळे विद्यार्थ्यांना त्यांची तांत्रिक कुशाग्रता आणि नाविन्यपूर्ण समस्या सोडवण्याची कौशल्ये दाखवता आली. या स्पर्धेत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तब्बल २०० प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमधून शाश्वत विकासासह आपत्ती प्रतिसादापर्यंतच्या विविध जागतिक आव्हानांवर उपाययोजना सादर करण्यात आल्या.
स्पर्धेची वैशिष्टये
मुंबईच्या सायन्स किड्झच्या विद्यार्थ्यांनी लेगो लाईन फॉलोअर विकसित करण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिंकले.
बंगळूरच्या राऊंड टेबल स्कूलच्या झेड एस केअर्स इंडिया संघाने दोन श्रेणींमध्ये सुवर्ण पदक पटकावले. लाइन फॉलोअर आणि रोबो सुमो विकसित करण्याच्या संकल्पनेसाठी प्रत्येक श्रेणीसाठी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही त्यांनी मिळवले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, पुणे येथील हायमॅक्सने लाईन फॉलोअर विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिंकले.
नाशिकच्या रे बॉट्स क्लबच्या रे बॉट्स संघाने लाईन फॉलोअर विकसनाच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक पटकावले.
नाशिकच्या के.के. वाघ कॉलेजच्या मॅट्रिक्स-२ संघाने रोबो सुमो विकसित करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिंकले.
इंदूरच्या एमराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या रोबोट्रॅकर्स संघाने नावीन्यपूर्ण मेझ सॉल्व्हर प्रकल्पासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक मिळवले.
चेन्नईच्या बन्नरी अम्मान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेगाव्होल्ट्झने त्यांच्या मेझ सॉल्व्हरमधील नाविन्यपूर्णतेसाठी ३० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक पटकावले.
जयपूरच्या प्रज्ञाकल्प क्लबच्या प्रज्ञाकल्प संघाने मुलींच्या अग्निशमन दलाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक मिळवले.
सायन्स किड्झच्या इन्फर्नोने मुलींच्या अग्निशमन दलाच्या प्रकल्पासाठी २० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिंकले.
मुंबईच्या सायन्स किडझच्या मेकर फायर संघाने ड्रोन एव्हिएशनसाठी ३० हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पुरस्कार जिंकले.
चेन्नईच्या सेव्हन्थ सेन्स रोबोटिक्स क्लबच्या रोबो चॅम्प्सनी आंत्रेप्रेन्युअरशिप चॅलेंजबाबतच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक मिळवले.
इंदूरच्या एमराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या दा विंचीने उद्योजकता आव्हानासाठीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी १५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक मिळवले.
