समाजाच्या उभारणीत ज्येष्ठांचे योगदान महत्त्वाचे – चंद्रकांत पाटील यांचे मत
पुणे : ” समाजात ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवी मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने जेष्ठ नागरिकांचे ज्ञान,अनुभव, तसेच हाताशी उपलब्ध असणारा वेळ यांचा योग्य मेळ घातल्यास;ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण अनेक भरीव विधायक कार्ये समाजासाठी करू शकतोत.” असे मत उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
जनसेवा फाऊंडेशन पुणे,सामाजिक न्याय आणि अधिकारिता – केंद्र शासन (NISD)(RRTC) राष्ट्रीय हेल्पलाइन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता – महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष पुणे महानगरपालिका लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना प्रांत ३२३४ डी २, NRIPO,पुणे आय एल सी (आय)पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, भारतीय योग संस्था पुणे, फेस्कॉम -पुणे व महाराष्ट्र ,अस्कॉप-पुणे शहर,मुकुल माधव फाऊंडेशन, मधुर भाव फाउंडेशन,आस्क पुणे, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, नवचैतन्य हास्ययोग परिवार, एकता योग ट्रस्ट, हेल्प एज इंडिया,यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दौलत सागरजी महाराज (वयवर्षे १०३),कोहिनूर समुहाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रविंद्र वंजारवाडकर, देविचंद जैन, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाने, आयकॉनचे उपाध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे, पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे,माजी आमदार मोहन जोशी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, कैलास पटेल,जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ विनोद शहा,जयदेव नायक यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते केरबा निवांगुणे वयवर्षे (१०५),रमेश पटवर्धन (१०२),गोरखे गुरुजी (१०२), सुधा सबनीस (१०२) रेखा पेठे यांना शतायुषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजभूषण विजयकांत कोठारी,लीला जोशी,ज्योती सचदे,अशोक परांजपे, यांना ज्येष्ठ नागरिक सन्मान पुरस्कार देण्यात आला,
डाह्याभाई शहा आणि कांचनबेन शहा या दांपत्याला आदर्श पतीपत्नी पुरस्काराने सन्मानित केले,डॉ संपत पुंगलिया, शिवानी पुंगलिया यांचा आदर्श कुटुंब पुरस्काराने सन्मान करण्यात आला, तसेच जनसेवा फाऊंडेशन पी.के.श्रॉफ जीवनगौरव पुरस्कार कांचन श्रॉफ यांच्या उपस्थितीत मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रा.विश्वासराव भदाने पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अविनाश लकारे लिखित वार्धक्य शारजाचा अभ्यास या पुस्तकाचे व विजय देशमुख लिखित अर्थक्रांती जीवन गौरव अभियान पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील’ म्हणाले; ‘समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे; पण सध्यस्थितीत समाज व कुटुंब हे ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते, कारण समाजात वृद्धाश्रम व निराधार आश्रमांची संख्या वाढतच आहे, हे भयानक आहे. आजचा तरुण उद्याचा प्रौढ तर परवाचा ज्येष्ठ नागरिक बनतो. आपला वृद्धापकाळ सुखा समाधानात जायचा असेल तर आपण आपल्या घरातील, समाजातील वृद्धांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे.शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत या योजनांचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखी ठेवावे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
