Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचा सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळा

    पुणे : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचा सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळा दिनांक ७ व ८ आॅक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. जुन्नर येथील श्री क्षेत्र ओझर मधील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद््घाटन शनिवार, दिनांक ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    बाळासाहेब औटी म्हणाले, उद््घाटन सोहळ्याला राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शहा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, आमदार अतुल बेनके, पंचायतीचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, धनंजय गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसात विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, महावितरण मुख्य अभियंता राजेंद्र पवार, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, सायबर सुरक्षा पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे, जनआरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ.अनंत फडके आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

    सूर्यकांत पाठक म्हणाले, थोर स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांनी सन १९७४ साली ग्राहक पंचायतीला सुरुवात केली. आजमितीस संपूर्ण भारतात ३७ प्रांतांमध्ये ग्राहक चळवळीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय आहेत. ग्राहक पंचायतीच्या पुढाकारातून १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. यामुळे मोठी न्याययंत्रणा उभारली गेली. आजमितीस हे कार्य भारतभर सुरु आहे.

    सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा समारोप सोहळा रविवार, दिनांक ८ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, पंचायतीचे राज्य संघटन मंत्री दिनकर सबनीस, राष्ट्रीय सहसचिव जयंत कथेरिया यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतातून ग्राहक चळवळीतील १ हजारहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading