दिव्यांग सैनिकांसमवेत हिंदू – मुस्लिम गणेश भक्तांची सद्भावना रॅली
पुणे : भारत माता की जय…वंदे मातरम् च्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर…सैनिकांवर केलेली पुष्पवृष्टी…अभिमानाने फडकणारा तिरंगा…अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सद्भावना रॅली काढण्यात आली. शहराच्या पूर्व भागात हिंदू मुस्लिम गणेश भक्तांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश देत सद्भावना रॅली काढली. देशसेवा करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशनतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, कर्नल वसंत बल्लेवार, क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट खडकीचे कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे, शिरीष मोहिते, विनायक घाटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, गिरीजा म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, नामदेव गायकवाड,कुलदीप पवार, सचिन माळी, सेवा मित्र मंडळ अध्यक्ष गणेश सांगळे, विक्रांत मोहिते, निलेश रसाळ, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे,अमर थोपटे, अभिषेक पायगुडे, लाला परदेशी, राजेंद्र काळभोर, अजय पंडित आदी उपस्थित होते.
नबीसाब नदाफ, जितेंद्र कुमार, प्रवेश कुमार तिवारी, गणेशाचार्य प्रकाश, रीता कटरे, हरिओम, प्रवीण कुमार मिश्रा, सादिक अरुण कुमार, उमाकांत भोसले, आर. एस. कावरे, करसनसिंह शेखावत, सुजीत कुमार, दिनेश देवरे, विनोद पथोडिया यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
हिंदू आणि मुस्लिम गणेश भक्तांनी दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्ती व हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गुरुवार पेठेतील मशिदीपासून रॅलीला प्रारंभ होऊन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे समारोप झाला.
संदीपसिंह गिल म्हणाले, कार्यक्रम २२ वर्षे चालू आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. देश गणपती उत्सवात व्यस्त असताना एकोप्याचा चांगला संदेश जात आहे. समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये आणि आपण एक आहोत, ही भावना निर्माण होत आहे.
आनंद सराफ म्हणाले, सामाजिक तणावावर उत्तर म्हणजे जवानांचा सन्मान आणि भारत माता की जय हा जयघोष आहे. मातृभूमीचे प्रेम प्रत्येकाने व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रप्रेम जपणारी मंडळी या भागात आहेत. ज्या जवानांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अभिमान वाटतो
शिरीष मोहिते म्हणाले, प्राणाचे बलिदान देऊन सैनिक आपली रक्षा करतात. त्यांची माहिती व्हावी, अपंगत्व आले असूनही त्यांची जिद्द सर्वाना समाजावी, हा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.