तरुणांनी सविनय कायदेभंगाचा मार्ग स्विकारावा – डाॕ. बाबा आढाव
पुणे : खाजगी एजन्सीजद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय रद्द करवून घेण्यासाठी तरुणाईने सविनय कायदेभंगाचा मार्ग स्विकारावा असे आवाहन बाबा आढावांनी केले. भारत जोडो अभियान, पुणे जिल्ह्याच्या वतीने शासकीय कंत्राटी नोकरभरती निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित निदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत जोडो अभियानाशी संबंधित सर्व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. बाह्य एजन्सीजद्वारे शासकीय कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाला हरताळ फासणारा आहे, समान काम समान दाम या तत्वाला पायदळी तुडवणारा आहे. त्याच बरोबर शासकीय कार्यालयाचं कामकाज आणखी विस्कळीत करणारा व नागरिकांना अडचणीत आणणारा ठरेल असे मत विविध वक्त्यांनी याप्रसंगी मांडले. हा शासन निर्णय रद्द करावा असे निवेदन याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले. निदर्शकांनी याप्रसंगी शासन निर्णयाची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला.