वास्तविकता पडद्यावर मांडायला सज्ज होतोय ‘खळगं’, ट्रेलरने वेधलंय लक्ष
बरेचदा चित्रपटांची कथा ही आकर्षून घेणारी असते. आशयघन कथानक, बोलीभाषा, कलाकारांचा दमदार अभिनय या सगळ्याच बाबी लक्षात घेता चित्रपट पाहावा की नाही हे आजकाल प्रेक्षकवर्ग ठरवतात. अशातच नुकत्याच समोर आलेल्या एका हृदयस्पर्शी ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या व सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या ‘खळगं’ या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
ट्रेलरवरून असा अंदाज वर्तवण्यात येतोय तो म्हणजे चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कथानक. नवोदित कलाकारांना घेऊन केलेली ही आखणी प्रेक्षकांना भावुक करणारी आहे. पोलीस होण्याची उमेद, त्यासाठीची एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग हे सगळं हुबेहूब या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. गावखेड्यातील व सत्यघटनेवर आधारित ‘खळगं’ नव्या कोऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.
अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पेलवली आहे. ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.
गावखेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन चित्रपटात नवोदित कलाकारांनी चांगलाच कल्ला केला. माधवी जुवेकर , कार्तिक दोलताडे , सुलतान शिकलगार , रोशनी कदम , प्रज्वल भोसले , प्रितम भंडारे , कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे ,माणिक काळे , वैष्णवी मुरकुटे , ज्वालामुखी काळे , भैरव जाधव , संकेत कवडे , शिल्पा कवडे , मयूर झिंजे , मोहन घोलप , मंगेश ससाणे , ऐश्वर्या लंगे , गणेश शिंदे , शरद पवार या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. नवोदित अभिनेत्यांनी केलेला हा चित्रपट आहे असं त्यांचा अभिनय पाहून म्हणणं चुकीचं ठरेल, यांत शंकाच नाही. चित्रपटाच्या ट्रेलरने या साऱ्याची रंगत वाढवलीच आहे, आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शनाची. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.
