लहान भावाचा साडीने गळा आवळून खून
नांदेड : मोबाईल मागितला म्हणून दोन भावांत हाणामारी झाली. रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाचा गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना नांदेड शहरालगतच्या गोपाळचावडी भागात घडली. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
गोपाळचावडीतील तुळजाभवानीनगरात राहणा-या करण राजू गवळे (वय २३) आणि अर्जुन राजू गवळे (२०) या सख्ख्या भावांत रविवारी (ता. २५) मध्यरात्री मोबाईलसाठी भांडण झाले. अर्जुन याने करणकडे मोबाईल मागितला. त्यावरून त्यांच्यात वाद, हाणामारी झाली. करणने अर्जुनला ढकलून दिले. तो पडल्यानंतर त्याचा गळा साडीने आवळला.
त्यातच त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत गवळे बंधूंचे मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, करबला, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयित करण याला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फौजदार पाटील तपास करीत आहेत.
