अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत विद्यार्थ्यांनी केली प्रतिकात्मक राक्षसाची होळी
पुणे : जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या राक्षसाची प्रतिकात्मक होळी केली. दारु, गुटखा, चरस, गांजा यांसारख्या व्यसनाधिनतेकडे नेणा-या गोष्टींच्या राक्षसाचे दहन यावेळी करण्यात आले. तसेच मी स्वत: व्यसनाधिनतेपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्याकरीता प्रयत्न करीन, अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली.
पोलीस अंमली पदार्थ विरोधी पथक, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि आपलं फाऊंडेशन तर्फे डेक्कन जवळील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स (एमएमसीसी) येथे ही प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सुनील थोपटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, प्राचार्य डाॅ, गोल्हार, प्रा. प्रविण कड, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा, तुकाराम पाटील, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. सुशील गंगणे, आपलं फाऊंडेशनचे मनीष भोसले, दीप घाटोळे, चंदन मकवाना, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डाॅ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, प्रकाश पवार, संतोष पटवर्धन यावेळी उपस्थित होते.
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, व्यसनांच्या विळख्यात अडकणा-या मुलांच्या संख्येइतकेच मुलींचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जनजागृतीपर उपक्रमांप्रमाणेच प्रत्यक्ष समुपदेशनावर भर देण्याचा प्रयत्न केंद्रातर्फे केला जात आहे. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
