Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. रविवारी (25 जून) दुपारी ही घटना घडली. दोन्ही मुलांच्या आकास्मित मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहेद इरफान सय्यद (वय 18) आणि आयुष संतोष पडवळ (वय 15) दोघे रा. डवाळा, ता. वैजापूर असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. शाहेद आणि आयुष हे एकमेकांचे शेजारी होते. आयुष हा गावातीलच मुक्तानंद विद्यालयात आठवीत शिकत होता. तर शाहेद हा संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोपरगाव येथे शिक्षण घेत होता. मात्र, सुट्टीला तो घरी येत असे. मागील शनिवारी (दि. 24) शाहेद घरी आला होता. तर रविवारी आयुष सोबत शाहेद बकऱ्या चारण्यासाठी गावालगतच्या पाझर तलावाजवळ गेले होता. यावेळी दोघांनाही पोहण्याचा मोह आवरला  नाही. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर दोघांना तळाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

दरम्यान, हा प्रकार इतर युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. तसेच पाण्यात शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला शाहेद सापडला तर तासाभराच्या शोधकार्यानंतर आयुष आढळून आला. या दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading