बालकलाकारांनी दिला व्यसनमुक्त भारताचा संदेश
पुणे : नशामुक्ति देश मेरी जिम्मेदारी है… मोबाईल का जरुरत से ज्यादा इस्तमाल इन्सान को गुलाम बना सकता है… आम्ही बालकलाकार संकल्प करतो की, गुटखा, दारू, सिगरेट, तंबाखू, रमी यांसह अमली पदार्थांची जाहिरात करणार नाही… अशी शपथ घेत बालकलाकारांनी व्यसनमुक्त भारताचा संदेश दिला.
सिने व नाट्य बालअभिनेता श्रीश खेडेकर व दर्श खेडेकर या बालकलाकार व इतर बालकलाकारांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे प्रबोधनपर अभियानाचे आयोजन केले. यावेळी श्री मार्तंड देवस्थान जेजुरी चे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, विकास माने, प्रशांत उंदरे, आनंद लोंढे आदी उपस्थित होते. श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे यांचे बालकलाकारांच्या मनातील या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. यावेळी श्रेशा तलवारे, प्रथमेश तलवारे, यश तलवारे, आकांशा उंदरे, अनन्या उंदरे, प्रणिता उंदरे, श्रीशा भोसले या बालकलाकारांनी उपक्रमात सहभाग घेतला.
श्रीश खेडेकर म्हणाला, आपला भारत देश व्यसनमुक्त राहावा, याकरता आम्ही बालकलाकार विविध माध्यमातून जनजागृती करीत असतो. दूरचित्रवाणी व प्रसारमाध्यमांवरून कलाकारच व्यसनांची जाहिरात करतात. त्यामुळे समाजात याबद्दल चुकीचा संदेश पोहोचत आहे. आम्ही बालकालाकार कोणत्याही व्यसनाची जाहिरात करणार नाही. तसेच इतरांनी कोणतेही व्यसन करू नये याकरिता जनजागृती करु.
