मराठी पुस्तक निर्मिती जगात सर्वश्रेष्ठ : राजेंद्र बनहट्टी
मसाप तर्फे पुष्पा पुसाळकर पुरस्कार अभिजित प्रकाशनाला प्रदान
पुणे : मराठी प्रकाशकांनी आधुनिक आणि विधायक अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुस्तक निर्मिती अधिक कल्पक, कलात्मक आणि मोहक केली आहे. इतर भारतीय आणि परकीय भाषांतील पुस्तकांपेक्षा मराठीतील पुस्तक निर्मिती उत्तम असून ती जगात सर्वश्रेष्ठ आहे असे मत माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सुविचार प्रकाशन पुरस्कृत पुस्तक निर्मितीसाठीचा पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार बनहट्टी यांच्या हस्ते अभिजित प्रकाशनाचे अ. वि. वाळिंबे यांना ‘ पॉईंट ऑफ व्ह्यू’ या पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रदान करण्यात आला त्यावेळी बनहट्टी बोलत होते.कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अ. वि . वाळिंबे, चैतन्य आणि प्रीती बनहट्टी उपस्थित होते. बनहट्टी म्हणाले, ‘अखेरचे आत्मचरित्र’ ही माझी कादंबरी हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांत अनुवादित झाली . त्या प्रकाशकांनी केलेली पुस्तक निर्मिती निकृष्ट दर्जाची आहे. जागतिक ख्यातीच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशकांच्या पुस्तकांपेक्षा मराठी प्रकाशकांच्या पुस्तकांची निर्मिती अधिक उत्तम आणि सरस आहे.
प्रा. जोशी म्हणाले, प्रकाशक हा लेखक आणि वाचक यांच्यातील दुवा आहे. प्रकाशकांनी मराठी साहित्य व्यवहाराचे पोषण केले आहे. मराठी पुस्तक निर्मितीत सहभागी असलेले लेखक, चित्रकार,मांडणी करणारे, मुद्रक या सर्वांना जे स्वातंत्र्य आहे आणि परस्पर संवाद त्यामुळे उत्तम पुस्तक निर्मिती मराठीत होत आहे. मराठी प्रकाशकांनी नव्या कल्पनांचे नेहमी स्वागत केले त्यामुळे आशय आणि विषयांचे वैविध्य मराठीत आहे. वाळिंबे म्हणाले, लेखकाइतकाच प्रकाशक सर्जनशील असतो त्याचे प्रतिबिंब पुस्तक निर्मितीत दिसते. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रीती बनहट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
