अन् साकारला अक्षर विठ्ठल…
पुणे : एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र सध्या हरिनामाच्या गजरात रंगला आहे, तर दुसरीकडे काळे ढग दाटून आल्याने पावसाची प्रतीक्षा लवकरच संपेल अशी आशा लागून राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी ‘अक्षर विठ्ठल’ साकारला… निमित्त होते आर्ट पुणे फाउंडेशन अच्युत पालव व त्यांच्या विद्यार्थ्यांचे ‘अक्षर पाऊस’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे.
आजपासून घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे सदर प्रदर्शन सुरू झाले असून येत्या रविवार दि २५ जून पर्यंत सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत पुणेकर रसिकांना ते पाहता येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
आज उद्घाटनावेळी अच्युत पालव यांनी चाळीस फूट बाय पाच फूट इतक्या मोठ्या आकारात ‘अक्षर विठ्ठल’ या विषयावर लाईव्ह कॅलिग्राफी डेमोस्ट्रेशन केले. यावेळी प्रसिद्ध गायक, संगीतकार व दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी, आर्ट पुणे फाउंडेशनचे संजीव पवार व प्रियंवदा पवार आदी उपस्थित होते. सुलेखनातून साकारलेला अक्षररुपी विठ्ठल यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ‘अक्षर पाऊस’ या प्रदर्शनात अनिता डोंगरे, श्रीकांत गवंडे, पूजा निलेश, निलेश गायधनी, प्रसाद सुतार, महेंद्र शिरोडकर, रसिका कोरगावकर, तृप्ती माने फुरीया, संजाली ओक, तेजस्विनी भावे, अमृता अमोद्कर, हर्षदा साळगावकर, घनशाम एरंडे, नयना लिमये, डॉ सायली पावसकर, रुपाली ठोंबरे, बी जी लिमये, तानिका केरकर आदी सुलेखनकारांच्या कलाकृती पाहता येणार आहेत.
