पं श्रीकांत देशपांडे मित्र परिवाराच्या वतीने संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं श्रीकांत देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याच्या उद्देशाने पं श्रीकांत देशपांडे मित्र परिवार आणि त्यांच्या पत्नी शीला देशपांडे यांच्या वतीने संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे हे ११ वे वर्ष असून येत्या गुरुवार दि. २२ जून रोजी सायं ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका सोमवार दि. १९ जून पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रसिकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

किराणा घराण्याचे सुरेल गायक, कुशल संघटक, संयमी आणि अचूक निर्णय त्वरीत घेण्याची क्षमता असलेले अशी ओळख असलेले पं श्रीकांत देशपांडे हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच जगभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे झाले याचेच औचित्य साधत यावर्षी ‘संगीत संध्या’ हा कार्यक्रम स्वरभास्कर पं भारतरत्न जोशी यांना समर्पित करण्यात आला असल्याची माहिती शीला देशपांडे यांनी दिली.
यावर्षीच्या संगीत संध्या कार्यक्रमात निषाद बाक्रे आणि विदुषी मंजिरी असनारे केळकर आपली गायनसेवा सादर करतील. निषाद बाक्रे यांना पं उल्हास कशाळकर, पं दिनकर कैकिणी, डॉ अरुण द्रविड, पं मधुकर जोशी आणि डॉ राम देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीनही घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली आहे. तर विदुषी मंजिरी असनारे-केळकर या जयपूर घराण्याच्या गायिका असून पं. सी टी म्हैसकर यांकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. या वेळी या दोघांनाही भरत कामत हे तबला तर सुयोग कुंडलकर हे संवादिनीवर साथसंगत करतील. प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
