कीर्तनकार ही समाजाची आई – कुट अभंग विवेचक ह.भ.प. महादेव महाराज राऊत
कुट अभंग विवेचक ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांना यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान
पुणे : कीर्तनकाराला संरक्षित आणि सुरक्षित ठेवणे हे समाजाचे कर्तव्य आहे. तर समाजाची सेवा करणे ही कीर्तनकाराचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र संपन्न आहे. इथे कधी अतिरेक झाला नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे कीर्तनकार आहे. कीर्तनकारांनी महाराष्ट्राला पुण्यशील बनवले आहे. त्यामुळे ख-या अर्थाने कीर्तनकार ही समाजाची आई आहे, असे प्रतिपादन कुट अभंग विवेचक ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांनी केले.
शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे ४ थ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन महोत्सवात यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार महादेव महाराज राऊत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे, प्राचार्य डाॅ. सुधाकर जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. मानाची शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
महोत्सवात ह.भ.प. प्रविण महाराज लोळे, कुट अभंग विवेचक ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन झाले. महोत्सवाच्या समारोपाला शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन झाले.
महादेव महाराज राऊत म्हणाले, विद्वत्ताप्रचुर माणूस कीर्तनाला उभा राहिला पाहिजे. समाजाने विद्वानांचा योग्य सन्मान केला पाहिजे. ज्यांच्या अंगी सहनशीलता येते ती माणसे मोठी होतात. कर्तृत्वाने मोठे होतात त्यांना यातना भोगाव्या लागतात, असेही त्यांनी सांगितले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने या चौथ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम संस्थेतर्फे घेतले जातात.
