सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सुरेश गोसावी यांनी पदभार स्वीकारला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २१ वे कुलगुरू म्हणून डॉ. सुरेश गोसावी यांनी आज पदभार स्वीकारला. या विद्यापीठाचा विद्यार्थी, शिक्षक,विभागप्रमुख, संचालक म्हणून काम केल्यानंतर कुलगुरु या पदाचा कार्यभार स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पाच वर्षाच्या पुढील कार्यकाळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्यास भर देणार असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले,” शैक्षणिक धोरणावर अधिक भर देऊन विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापुर्ण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे ह्या बाबीला प्राधान्यक्रम राहील. तसेच विविध योजना आखल्या असून त्याच्या अमलबजावणीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करण्यावर भर राहील.
