Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बाबा रामदेव यांच्यासह पुणेकरांनी साधला ‌‘योग’

पुणे : योगसाधना जीवनाचा आधार आहे. दीर्घायुष्यासाठी नियमित योगसाधना करताना संतुलित आहारात भरड धान्याचा समावेश असावा. आरोग्य शिक्षणाबरोबरच आहाराविषयीची जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. आयुष्य-वयोमानाची गणना केवळ दिवसांमध्ये नव्हे तर शारीरिक स्वास्थ आणि तंदुरुस्तीद्वारे करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत आज (दि. 4) योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहाटे 5 वाजता सहकार नगर येथील सदू शिंदे मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केले होते. आपले स्वास्थ उत्तम व आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या विषयावर योगगुरू बाबा रामदेव यांनी जितो सदस्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. बाबा रामदेव यांच्यासमवेत योगसाधना-प्राणायाम करण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळाली. जितो स्पोर्टस्‌‍ ॲपेक्सचे अध्यक्ष विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला यांनी बाबा रामदेव यांच्यासह योगसाधना केली.

आरोग्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता विशद करताना बाबा रामदेव म्हणाले, नागरिकांनी व्यसन, दुर्गुणांच्या आहारी न जाता रोग-व्याधीमुक्त जीवनाला प्राधान्य दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद विवेकपूर्णतेने घेणे आवश्यक आहे. आहारात मीठ, साखर, तळकट, तुपकट अन्नाचा अतिरेक न करता भाज्या, फळांचे रस, भरड धान्याचा उपयोग केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

योगसाधनेची सुरुवात योगिक जॉगिंगने केल्यानंतर सूर्यनमस्कारासह विविध आसनांची, प्राणायामाची माहिती देत त्याची उपयुक्तता बाबा रामदेव यांनी पटवून दिली. ताडासन, वृक्षासन, गरुडासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, अर्ध हलासन, मकरासन, अर्ध पवन मुक्तासन, मर्कटासन, उष्ट्रासन, गोमुखासन अशा विविध आसनांसह प्राणायामातील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोमचे प्रात्यक्षिक दाखवित उपस्थितांकडून ते करवून घेतले. दिवसातून कमीतकमी एक तास तरी व्यायाम-योगसाधना करा असा सल्लाही त्यांनी दिला.

 

योग हे महत्त्वाचे तत्त्व आहे. त्याची अवहेलना करू नका. योगसाधनेने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्व प्रकारचे स्वास्थ्य तसेच सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. सकाळी योगसाधना करा, नंतर दिवसभर कर्मयोग, सहयोग करून कर्मयोगी, सहयोगी, उपयोगी, उद्योगी, उद्यमशील बना.

– बाबा रामदेव, योगगुरू

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading