fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत यश

पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. ट्रस्टने शैक्षणिक साहित्यासह इतर सर्वच गोष्टींकरीता दिलेला मदतीचा हात आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द यामुळे योजनेअंतर्गत ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत भरारी घेत उत्तम कामगिरी केली आहे.

ट्रस्टच्या योजनेतील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकणा-या प्रेमराज गोयकर या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. धुळे येथील कोठारे बोरसुले गावात राहणा-या प्रेमराज कडे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसूनही त्याने उत्तुंग यश मिळविले आहे. त्याचे वडिल शेतकरी असून भविष्यात त्याला आयआयटी उत्तीर्ण करायचे आहे.

मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणा-या प्रज्ञा जाधव हिने ९०.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रज्ञा ही जनवाडी गोखलेनगर परिसरात रहात असून तिचे वडिल सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर, आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने हे यश मिळविले आहे. भविष्यात इंजिनिअरींग करायचे असल्याचे तिने सांगितले. तसेच, आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूलमध्ये शिकणा-या त्रिशा गोसके हिने ८९.६० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला आहे.

याशिवाय प्रज्वल केदारी, तेजस मोरे, हर्षवर्धन खोपडे, गणेश भगत, स्नेहा मराठे, सिद्धार्थ शेडे, निर्मीती ओव्हाळ, कुणाल दिघे यांनी देखील उत्तुंग यश मिळवुले आहे. ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, सन २०१० पासून ही योजना सुरु असून विद्यार्थ्यांना संस्कार वर्ग, समुपदेशन, शिकवणी, परीक्षा, शैक्षणिक साहित्य, १ लाख रुपयांचा विमा या सर्व सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यादृष्टीने ट्रस्ट प्रयत्नशील आहे. आजपर्यंत ८५ विद्यार्थी विविध क्षेत्रात संपूर्ण देशात उच्चपदांवर कार्यरत आहेत. यापुढे देखील योजनेतील विद्यार्थ्यांना सर्व मदत ट्रस्ट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading