Maharashtra SSC 10th Result 2023 : छंद जोपासत पुण्याच्या स्वरालीने मिळविले 100 टक्के
राज्यातील 151 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेचा राज्यातील एकूण निकाल हा 93 टक्के इतका लागला. विशेष म्हणजे या परीक्षेत राज्यातील 151 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी अर्थात 100 टक्के गुण मिळाले आहेत. पुणे शहरातील टिळक रोड येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर याच शाळेतील स्वराली राजापूरकर हिला देखील 100 टक्के गुण मिळाले आहेत.
आपल्या निकालावर प्रतिक्रिया देताना स्वराली राजापूरकर म्हणाली, शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच मी रोज किमान दोन तास अभ्यास करायचे. विशेष म्हणजे या काळात मी नृत्य, गायन, ढोल वादन हे छंद देखील जोपासले. यामुळे माझा मूड फ्रेश व्हायचा. त्यामुळे परीक्षेच कधी टेंशन आलं नाही. नियमीत अभ्यास असल्यामुळे 97, 98 टक्के पडतील अशी अपेक्षा होती. मात्र 100 टक्के मिळाल्याचे काळाल्यावर विश्वास बसला नाही. मग शिक्षकांनी आणखी काही निकालाच्या लिंक पाठवल्या त्यावर तपासल्यावर आमचा यावर विश्वास बसला.
या क्षणी शाळेच नाव पुढे नेल्याचा अभिमान वाटत आहे. वर्षभराच्या काळात माझे आई – बाबा व शिक्षकांनी मार्गदर्शन केले, आशा भावना स्वरालीने व्यक्त केल्या. तसेच पुढील शिक्षण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
